Wednesday, July 22, 2026
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविले; शरद पवार म्हणाले,...

Sharad Pawar : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविले; शरद पवार म्हणाले, “सरकारची भूमिका…”

मुंबई | Mumbai

दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर ‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र वळण लागले आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या या आंदोलनात, गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wanghchuk) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बळजबरीने ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी प्रचंड गोंधळ उडाला आणि राजकीय वातावरणही तापले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

सरकारची भूमिका पूर्णपणे बेजबाबदार

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांना अटक होईल किंवा कारवाई होईल अशी शक्यता वाटत होती, आणि अखेर नेमकं तसंच झालं. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होती. शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असतानाही धर्मेंद्र प्रधान यांनी ती काळजीपूर्वक हाताळली नाही, ज्याचे गंभीर परिणाम हजारो विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. सोनम वांगचुक यांनी देशातील महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या मांडल्या होत्या. मात्र, एवढे दिवस आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली. सरकारमधील एकाही प्रतिनिधीने त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे सौजन्य दाखवले नाही. यावरून केंद्र सरकारची भूमिका किती बेजबाबदार आहे, हे स्पष्ट होते”, असे ते म्हणाले.

हे देखील वाचा : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून बळजबरीने उचललं; अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा

विरोधी पक्षांचा पाठिंबा, संसदेत आवाज उठवणार

या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह (Congress and NCP SP) सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी यापूर्वी वांगचुक यांची भेटही घेतली होती. आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहून सरकारने पहाटेच्या वेळी ही कारवाई केली, असा आरोप शरद पवारांनी केला. हे प्रकरण इथेच थांबणार नसून, येत्या २० तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या वतीने हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला जाईल आणि सरकारला जाब विचारला जाईल,” असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

कारवाईमुळे जंतरमंतरवर गोंधळ

सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ गेल्या २० दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषणाला बसले होते. मात्र, आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी न्यायालयाचे (Court) आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा दाखला देत वांगचुक यांना उपोषणस्थळावरून बळजबरीने हलवले आणि रुग्णालयात दाखल केले. या अचानक झालेल्या पोलीस कारवाईमुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

हरणबारी धरण ओव्हरफ्लो; मोसम खोरे सुखावले

0
अंबासन | वार्ताहर Ambasan गत तीन-चार दिवसापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोसमखोर्‍यास वरदान ठरलेले हरणबारी धरण आज सकाळी तुडूंब भरल्याने सांडव्यावरून पाणी कोसळू लागल्याने...