नवी दिल्ली | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री (Karnataka CM) बदलावरून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत होत्या. त्यानंतर अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलावर शिक्कामोर्तब झाले असून, डी.के. शिवकुमार (D.K. Shivkumar) आता नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (गुरुवारी) मंत्रिमंडळाची ब्रेकफास्ट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली असून, दुपारी तीन वाजता ते राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२०२३ मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार (Congress Government) स्थापन झाल्यानंतर २३ मे रोजी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा रंगली होती. त्यानुसार पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या आणि त्यानंतरची अडीच वर्षे डी के शिवकुमार मुख्यमंत्री राहतील, अशी चर्चा होती. मात्र, सरकारला तीन वर्षे पूर्ण होऊनही सत्ता परिवर्तन झाले नव्हते. यामुळे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये राजकीय तणाव वाढल्याचे चित्र होते. त्यानंतर आता सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडण्यास नव्हते तयार
डी.के. शिवकुमार यांच्या गटातील लोक सातत्याने मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करत होते. नुकतीच दिल्लीत याबाबत बैठक देखील पार पडली होती. या बैठकीनंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. यात त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात राज्यसभेवर घेऊन मोठी जबाबदारी आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री बनविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
कोण आहेत डी.के. शिवकुमार?
काँग्रेसचे संकटमोचक असलेले डी.के. शिवकुमार हे रिसॉर्ट पॉलिटिक्ससाठी ओळखले जातात. शिवकुमार यांनी कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारदेखील वाचवले आहे. तर, प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह यांना देखील भारी पडले होते. शिवकुमार हे केवळ एक कसलेले राजकारणी नसून, एक शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. देशभरात जेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार अडचणीत आले, तेव्हा तेव्हा ते वाचवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच अष्टपैलू आणि संकट निवारक क्षमतेमुळे त्यांना काँग्रेसचे ‘संकटमोचक’ (Troubleshooter) म्हटले जाते. सध्या ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) असून राज्य काँग्रेसचे अध्यक्ष (KPCC Chief) देखील आहेत. शिवकुमार हे अनेक वेळा आमदार (MLA) राहिले असून ते कनकपुरा मतदारसंघातून निवडून येतात. त्यांनी जलसंपदा, ऊर्जा आणि बंगळुरू विकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत. २०२३ मध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते.




