नाशिक | Nashik
जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेटे यांचा राजकीय वावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दिसत आहेत. शेटे यांच्या या दुहेरी राजकीय भूमिकेमुळे ते साहेबांच्या (शरद पवार) की दादांच्या (अजित पवार) राष्ट्रवादीत आहेत? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ३८ महत्वाचे निर्णय
दिंडोरी लोकसभेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणण्यात श्रीराम शेटे यांची भूमिका निर्णायक ठरली. शरद पवार यांनी शेटे यांच्या सांगण्यावरूनच भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर शेटे यांनी जीवाचे रान करून भगरे यांना निवडून आणले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
हे देखील वाचा : Political Special : ‘शिवस्वराज्य यात्रा’ कोणत्या उमेदवाराला पावणार?
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) जिल्हा दौऱ्यावर आले, तेव्हा श्रीराम शेटे त्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले. त्यानंतर जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आली असता दिंडोरीत शेटे यांचे मोठे फलक लावण्यात आले होते. अजित पवारांनी शेटे चेअरमन असलेल्या काट्वा सहकारी साखर कारखान्यावर पत्रकार परिषदही घेतली होती. शिवाय शेटे यांच्या निवासस्थानी अजित पवारांनी चहापान घेतले होते. त्यामुळे शेटे अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात झाली.
हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द
तसेच काही दिवसांपूर्वी श्रीराम शेटे यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाशिक येथील फार्महाऊसवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये अर्धा ते एक तास बंद दाराआड चर्चाही झाली. मात्र, या चर्चेचा तपशील कळू शकलेला नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांशी शेटे यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटीगाठी आणि दिंडोरी तालुक्यातील अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काही फलकांवर झळकणारे फोटो यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
हे देखील वाचा : संपादकीय : ३० सप्टेंबर २०२४ – निवडणुकांसाठी एक धडा
दरम्यान, शेटे यांच्या या दुहेरी राजकीय (Political) भूमिकेमुळे त्यांची शरद पवारांसोबत असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. श्रीराम शेटे यांनी आपण नेमके कोणासोबत आहोत? ते एकदा स्पष्ट करायला हवे, नाहीतर त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला दिंडोरी तालुक्यात बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा