Thursday, March 13, 2025
HomeनाशिकPolitical Special : पाथर्डीतील बदलते राजकारण कोणाच्या फायद्याचे?

Political Special : पाथर्डीतील बदलते राजकारण कोणाच्या फायद्याचे?

इंदिरानगर | किशोर चौधरी | Indiranagar

मनपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे (Local Body Election) मागील तीन वर्षापासून माजी नगरसेवक यांच्यासह इच्छुक आस लावून बसलेले आहेत. या बदलत्या परिस्थितीमध्ये लोकसभा, विधानसभेच्या वाऱ्यानंतर अनेकांची चलबिचल झाली आहे, होत आहे. पाथर्डी परिसरातूनही विधानसभेच्या निवडणुकीनंतर मनसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, रा. काँग्रेस (शप) व इतरांमध्ये चलबिचल सुरू आहे. इच्छुक असलेले उमेदवारांनी भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेनेकडे लक्ष पुरवले आहे तर ठाकरे शिवसेनेतूनही अनेकांनी काढता पाय घेण्याचे ठरवले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक युवासेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ च उपमहानगरप्रमुख त्र्यंबक कोंबडे यांनी प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे उबाठाचे या भागातील पारडे कमजोर झाले आहे तर आधीच भाऊगर्दी असलेल्या भाजपमध्ये (BJP) या दोघांची भर पडली आहे.

- Advertisement -

ठाकरे शिवसेनाकडून (Shivsena UBT) अग्रेसर असलेले शिरसाट यांनी मागील पाच-सहा वर्षांपासून प्रभाग ३१ मध्ये चांगले कामे करून तसेच कार्यक्रम राबवून स्वतःचे व पक्षाचे नाव घराघरात पोहोचवण्याचे काम केले होते. आपल्या शांत संयमी स्वभावातून त्यांनी आपली एक वेगळी छाप प्रभागात पडलेली आहे. नाशिक पश्चिम विधानसभेत ठाकरे गटाची झालेली पिछेहाट पाहता व परिसरातून मिळालेले मतदान बघता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही असेच मतदान झाल्यास नुकसान होण्याची धास्ती घेत त्यांनी काढता पाय घेतल्याचे समजते. परंतु भाजपमध्ये गेल्यानंतर ही त्यांची अडचण होते की, त्यांना सामावून घेतले जाते, यावर खलबते सुरू झाली आहेत. तर या आधीच आयारामांना पक्षाने प्रवेश देऊ नये दिल्यास त्यांच्यासाठी कामे करणार नाहीत किंवा त्याचा परिणाम होईल, असे इशारे येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याआधीही दिलेले आहेत. तरीही आयारामांसाठी भाजपने दरवाजे खुले ठेवल्याने भाजपमधील दहा-पंधरा वर्षांपासून कामे करणाऱ्या या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होते की, त्यांना अपेक्षेप्रमाणे न्याय मिळतो, याबाबत ही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये ही या प्रभागातून नेतृत्व करत असलेले सुदाम ढेमसे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला होता तर त्याच्या आधीही असलेले मनसेनेचे (MNS) सुदाम कोंबडे यांनी चांगले कामे करून शेवटी शेवटी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला प्रवेश त्यांना महागात पडला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता होणार नाही ना, यासाठी शिरसाट व पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन प्रभागातील नाराज असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे. थोडक्यात या ठिकाणी त्यांना शून्यातूनच सुरुवात करावी लागणार आहे. ठाकरे शिवसेनेत असताना स्वयंस्फूर्तीने घेतलेले निर्णय व कार्यक्रम, उपक्रम त्यांना करता येत होते. या ठिकाणी मात्र, भाजपच्या अनुशासनानेच त्यांना कामकाज करावे लागणार असल्याने त्यांच्यातील असलेल्या शिवसैनिक स्तब्ध राहू शकेल का? प्रवेशाच्या दिवशीच महसूलमंत्र्यांनी महायुती राहू शकेल, असे संकेत दिलेले असताना या प्रभागातून आधीच शिंदे गटाचे दोन व भाजपचे दोन असलेले माजी नगरसेवक यांना तसेच ठेवल्यास शिरसाठ यांची मात्र कोंडी होणार आहे. शिरसाट यांच्या जाण्याने या प्रभागातील ठाकरे गटाचे नुकसान होते की, भाजपचा फायदा होतो की, शिरसाठ यांचा पक्ष बदलण्याचा निर्णय चुकतो हे येणाऱ्या काळातच कळणार आहे.

भाजपमध्ये या आधीच दहा ते पंधरा वर्षांपासून पक्षासाठी व आमदारांसाठी काम करणारे तिकिटाच्या आशेने काम करीत आहेत. महायुती झाल्यास मात्र त्यांचाही हिरमोड होतो का, ते इतर पक्षाची वाट धरतात, हे निवडणूक येण्याच्या काही काळ आधी कळणार आहे. चार महिन्याच्या अंतराने निवडणुका होतील, या आशेवरती अनेकांनी तीन वर्षांपासून विविध कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे, करीत आहेत. अशातच मनपाच्या निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसे तसे या प्रभागातील गणितेही बिघडत चाललेली आहेत. अनेक मातब्बरांनाही प्रभागातून काय करावे, असे प्रश्न निर्माण होत आहेत. पुढे जाणाऱ्या निवडणुकींमुळे (Election) सर्वच पक्षांमध्ये अस्वस्थता कायम दिसून येत आहेत. पुढे जाणाऱ्या निवडणुकीमुळे काहींनी झालेला मोठा खर्चाला आवर घालत हात आखडता घेण्याची भूमिका घेतली आहे तर काहींनी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या संपर्कात राहणे पसंत केले आहे. अंदाजे नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास होऊ शकणाऱ्या मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झाल्यास तर दोन महिने आधी या प्रभागातून मोठ्या प्रमाणात आयाराम-गयारामांची भूमिका घेतल्याचे दिसून येईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...