Wednesday, April 8, 2026
Homeनगरकार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून राजकीय निर्णय घेणार; माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे सूचक...

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून राजकीय निर्णय घेणार; माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे सूचक विधान

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

मी या घडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता असून शरद पवार यांच्याबाबत माझ्या मनात मोठा आदर आहे. अनेक दशकांपासून आमच्या कुटुंबाशी जोडलेल्या मतदार संघातील कार्यकत्यांच्या भावनांचा आदर राखत त्यांच्याशी संवाद साधून राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीबाबत राजकीय निर्णय घेणार असल्याचे मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

- Advertisement -

माजी मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून विकास आघाडी सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. जुन्या कनगर रस्त्याचा एक टप्पा, येवले आखाड्याचा मुख्य रस्त्याचे काम पुर्णत्वास गेले आहे. जे पैसे असूनही देखील प्रशासकाच्या काळात तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्य हस्तक्षेपामुळे मागे पडले होते. राहुरी शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन योजनेच्या वीज बिलासाठी नगरपरिषदेचा मोठा खर्च होत होता. त्यामुळे २५० किलोवॅट क्षमतेची सौर योजना कार्यान्वित करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढिल ५ वर्ष राहुरी शहरातील पाणीपट्टीत कोणतेही वाढ होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या प्रयत्नातून १५५ नवीन घरकुल मंजूर करून आणले. एकलव्य वसाहत ठिकाणी जाऊन जागेची तांत्रिक समस्या संपुष्टात आणून त्यांनाही लवकरच चांगली घरकुल योजना राबवणार आहे.

शिक्षक क्षेत्रातील नगराध्यक्ष लाभल्याने सायंकाळी ७ वाजता सायरन वाजताच विद्यार्थी अभ्यास करत आहेत. शहरातील तरुणांना अत्याधुनिक अभ्यासिका करण्यासाठी बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा असावा यासाठी पुढाकार घेतला आहे. नगर परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून पुतळा उभारला जाणार असल्याचे सांगत धर्मवीर संभाजी महाराज यांचाही पुतळा उभारणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. तसेच साहितरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाचे अनावरण झाले आहे. राहुरी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बारवेचेही नामांतर होणार आहे.

अल्पसंख्यांक विभागाकडे मुस्लिम समाजासाठी राहूरी शहर व वांबोरी येथे जैन व मुस्लिम बांधवांच्या हितार्थ २ कोटी रुपयांची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे. शहरातील रस्त्यांसाठी २.५ कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून पालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. १ कोटी रुपयांचा निधी वापरत एकनाथनगर येथे सुसज्ज असा उद्यान निर्मित होणार आहे. नगर विकास खात्याचे मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन १३० कोटी रुपयांचे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी रक्कम मिळावी म्हणून तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी बाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, मी आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. निळवंडे धरणासाठी लढा देत कालव्याचे काम पूर्ण करून निळवंडे धरणाचे पाणी राहूरी तालुक्यात आणल्याचे मला समाधान आहे. शेतकऱ्यांच्या वीज समस्येला सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मोठ्या प्रमाणात निधी देऊनही आज शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही आहे. मंत्री पद असताना वांबोरी चारी असो डावा व उजवा कालव्याचे कधीच कळ न दाबता मुबलक पाणी पुरवठा करण्याचे काम केले. मी मंत्री असताना एका फोनवर रोहित्र देण्याचे काम केले. त्यामुळे मी संपूर्ण मतदार संघातील जनतेशी संवाद साधून मी आगामी राजकीय निर्णय घेणार आहे.

विकास कामासाठी सत्तेत असावे हे कटू सत्य बनले आहे. मी अजून तरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असून शरद पवाराबाबत माझ्या मनात मोठा आदर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक करावे लागेल. कारण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना माध्यमातून त्यांनी ब्राम्हणी परिसरात सौर कृषी योजना मंजूर करून त्या परिसरातील शेतकऱ्यानं दिवसा बीज पुरवठा होणार आहे. बहमत शासनाकडे असतानाही तत्काळ निर्णय होत नाही. त्यावर मी माझे मत व्यक्त करताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १० आमदार सत्तेत सहभागी होऊ शकतात, असे बोललो होतो. त्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, आरिफ शेख, प्रशांत डौले, अविनाश म्हसे, महेश उदावंत, नीलेश जगधने, विजय तमनर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ लाखांची मदत

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे ३ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली....