Thursday, April 2, 2026
HomeनगरRahata : गर्भलिंग निदान रॅकेटविरोधात राहाता तालुक्यात संतापाचा वणवा

Rahata : गर्भलिंग निदान रॅकेटविरोधात राहाता तालुक्यात संतापाचा वणवा

दोषींच्या मुसक्या आवळून परवाने रद्द करण्याची मागणी || वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक संघटना आक्रमक

राहाता |प्रतिनिधी| Rahata

दैनिक सार्वमतमध्ये गर्भलिंग निदान रॅकेटबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच, राहाता तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या खळबळजनक वृत्ताने केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींना पुरते हादरवून सोडले आहे. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’सारख्या राष्ट्रीय मोहिमेच्या मुळावर घाव घालणार्‍या या अमानुष प्रकारांवर आता कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

हे वृत्त प्रसिद्ध होताच सकाळपासूनच नागरिकांनी ‘सार्वमत’ कार्यालय आणि प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून आपला रोष व्यक्त केला. हे प्रकार खरे असतील, तर ही केवळ कायद्याची नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेची हार आहे, अशी भावना एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली. वारंवार अशा घटना समोर येत असल्याने आतापर्यंत झालेल्या कारवाया केवळ नावापुरत्याच होत्या का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महिला संघटनांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. शासकीय पातळीवर जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मग तरीही अशा रॅकेटला मोकळे रान मिळतेच कसे? असा सवाल महिला पदाधिकार्‍यांनी विचारला आहे. त्यांनी संबंधित संशयित केंद्रांचे परवाने तातडीने रद्द करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. या प्रकारांमुळे प्रामाणिक सेवा देणार्‍या डॉक्टरांमध्येही नाराजी आहे. एका नामांकित डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण डॉक्टर वर्ग बदनाम होतो आणि समाज आमच्याकडे संशयाने पाहू लागतो. वैद्यकीय व्यवसायाची विश्वासार्हता टिकवण्यासाठी या ‘ब्लॅक शीप्स’वर कारवाई होणे गरजेचे आहे.

स्थानिक नागरिकांनी थेट प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट सुरू असताना आरोग्य विभाग, पोलीस आणि दक्षता समित्या झोपल्या होत्या का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. यामागे केवळ हलगर्जीपणा आहे की कुणाचे वरदहस्त लाभले आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
राजकीय वर्तुळातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत दोषींना पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान नागरिकांनी आता केवळ नोटीसबाजी नको, तर संयुक्त कृतीदल स्थापन करून प्रत्यक्ष स्टिंग ऑपरेशन आणि धडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. एकूणच सार्वमतच्या या वृत्ताने समाजाच्या विविध थरांना एकत्र आणले असून, आता प्रशासन यावर काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.

ज्या हातांमध्ये देवाने ‘जीवन’ देण्याचं वरदान दिलं, तेच हात आज रक्ताने माखले आहेत, हे पाहून माणुसकीलाही लाज वाटत आहे. पांढरा कोट घालून देवदूत बनलेले राहात्यातील काही डॉक्टर आज पैशाच्या हव्यासापोटी कसाई बनले आहेत. गर्भातील त्या चिमुकल्या जिवाला हे जग पाहण्याचा अधिकार आहे, पण केवळ ‘मुलगी’ आहे म्हणून तिची गर्भातच निर्घृण हत्या केली जात आहे. ज्या क्लिनिकमध्ये हा पापाचा बाजार मांडला जातो. तिथे कायद्याचा बडगा असा बसला पाहिजे की पुन्हा कोणाचंही धाडस होता कामा नये. प्रशासनाने आता फक्त नोटिसा पाठवून शांत बसू नये. अशा कसाई डॉक्टरांचे परवाने कायमचे रद्द करून त्यांना जेलच्या गजाआड धाडावे, तरच या समाजातील ही घाण साफ होईल. स्त्री भ्रूणहत्या हे एक महापाप आहे आणि हे पाप करणार्‍यांना तसेच त्याला साथ देणार्‍यांना आता समाजात जागा उरता कामा नये.
– कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी

स्त्री भ्रूण हत्येबाबत समाजात जागृती निर्माण झाली असली, तरी उच्चभ्रू समाजात हे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून नागरिकांनी स्वतः सतर्क राहून अशा प्रवृत्तींचा बिमोड करणे काळाची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्या कमी झाल्याचा समज खोटा ठरवणारी अनेक प्रकरणे शहरात समोर येत आहेत. विशेषतः शिकलेल्या ‘व्हाईट कॉलर’ वर्गाकडून असे गुन्हे घडत आहेत. जनजागृती आणि सामूहिक प्रतिकार हाच यावरचा खरा उपाय आहे. स्त्री भ्रूणहत्येची समस्या आता शहरांमध्ये आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये अधिक तीव्रतेने दिसतेय. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी समाजाने सतर्क राहून प्रशासनाला साथ दिली पाहिजे.
– हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येची बातमी वाचून मन सुन्न झाले आहे. शिर्डीपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या राहाता शहरात डॉक्टरांनी केलेले हे कृत्य राक्षसी आहे. राहाता शहरात जो प्रकार समोर आला आहे, तो मानवतेला काळिमा फासणारा आहे. गर्भलिंग निदान करून भ्रूणहत्या करणार्‍या डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना समाजात स्थान नाही.
– श्रीमती मिनालताई रेड्डी, भारतीय लहुजी सेना

ताज्या बातम्या

Nashik Crime : पाटणकर टोळीचा पोलिसांनी केला ‘करेक्ट’ कार्यक्रम; सात जणांवर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना (Police) गुंगारा...