Sunday, April 12, 2026
Homeक्राईमAhilyanagar : अहिल्यानगरात डीजेवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा

Ahilyanagar : अहिल्यानगरात डीजेवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा

मिरवणुकांत ध्वनीप्रदूषण || 8 मंडळ अध्यक्ष व 8 डीजे मालकांवर न्यायालयात खटले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मिरवणुकांमध्ये डीजेचा कर्णकर्कश आवाज करून ध्वनीप्रदूषण करणार्‍या आठ मंडळ अध्यक्षांसह आठ डीजे मालकांविरूध्द शहर पोलिसांनी न्यायालयात खटले दाखल केले आहेत. यापूर्वीही अशाच स्वरूपाचे चार खटले दाखल करण्यात आले होते. तिथीनुसार साजर्‍या झालेल्या शिवजयंती तसेच श्रीराम नवमी मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

सण, उत्सव, लग्न समारंभ तसेच धार्मिक मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः शहरातून निघणार्‍या मिरवणुकांमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच बंदोबस्तावर असलेले पोलीस यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा राजकीय हस्तक्षेप किंवा दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होत नसल्याची चर्चा होती. यापूर्वी कारवाई झाल्यास मिरवणूक किंवा कार्यक्रम संपल्यानंतर डीजे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात.

मात्र एक-दोन दिवसांत साहित्य परत मिळत असल्याने डीजे चालक किंवा मालक पुन्हा त्याच पध्दतीने ध्वनीप्रदूषण करत असल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी आळा बसत नव्हता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे व पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत खटले दाखल केले आहेत.

सुरूवातीला झेंडा मिरवणूक व तारखेनुसार झालेल्या शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजवल्याप्रकरणी चार मंडळ अध्यक्ष व डीजे मालकांविरूध्द खटले दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथीनुसार साजर्‍या झालेल्या शिवजयंती तसेच श्रीराम नवमी मिरवणुकांमध्येही डीजेचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मिरवणूक संपल्यानंतर डीजेचे सर्व साहित्य जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत न्यायालयात खटले दाखल केले आहेत.

अशी केली जाते कारवाई
मिरवणुकांमध्ये डीजे वाजवू नये यासाठी संबंधित मंडळ अध्यक्ष व डीजे चालक/मालकांना पूर्वीच नोटीस दिली जाते. मिरवणूक मार्गावरील आवाजाची डेसिबल पातळी पंचांच्या उपस्थितीत मोजून त्याची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात केली जाते. नोटीस देऊनही नियमांचे उल्लंघन करून मिरवणुकीत डीजे वाजवण्यात आल्यास, मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांकडून सर्व साहित्य जप्त केले जाते. त्यानंतर संबंधितांना महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 च्या कलम 8 अन्वये नोटीस देऊन स्पष्टीकरण सादर करण्याची संधी दिली जाते. यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत तसेच महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील कलम 15 व 19 नुसार संबंधितांविरूध्द थेट न्यायालयात खटले दाखल केले जातात.

यांच्यावर झाले खटले दाखल
श्रीराम सेना, नागापूर, बोल्हेगाव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक चंद्रशेखर कांबळे व डीजे मालक संकेत ज्ञानदेव शेवाळे, वास्तव कंपनी, सावेडी गाव मंडळाचे अध्यक्ष खंडू शेषेराव डेरे व डीजे मालक प्रवीण गुलाब भालसिंग, शिवभिम शक्ती प्रतिष्ठान, केडगाव मंडळाचे अध्यक्ष सचिन संतोष पवार व डीजे मालक शुभम गुलाब धामणे, सकल हिंदू समाज, अहिल्यानगर मंडळाचे अध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल व डीजे मालक नागेश मच्छिंद्र लोखंडे, साईबाबा मित्र मंडळ, खळेवडी-भिंगारचे अध्यक्ष सचिन नितीन जाधव व डीजे मालक मंगेश सुभाष कामटे, जय बजरंग मित्र मंडळ, वडारवाडी-भिंगारचे अध्यक्ष गणेश सुभाष डोकडे व डीजे मालक रवीराज विलास कांबळे, जय तुळजाभवानी युवामंच, अहिल्यानगर मंडळाचे अध्यक्ष ऋषीकेश शंकर कुरापट्टी व डीजे मालक प्रथमेश प्रमोद कंक, तसेच वर्चस्व ग्रुप, वंजार गल्ली मंडळाचे अध्यक्ष अमित शिवाजी करे व डीजे मालक शक्तीमान राजेंद्र माने यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक; एकाला अटक, दुसरा...

0
नाशिक | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या भाविकाची व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....