अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
टोळक्याने धारदार शस्त्र, फायटर, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने तरूण व्यावसायिकावर हल्ला करून जखमी केले. त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम लुटल्याची घटना एमआयडीसीच्या सम्राट चौकात गुरूवारी (13 फेब्रुवारी) रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर बाळू साठे (वय 37 रा. निंबळक, ता. नगर) असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत संसारे (रा. निंबळक ता. नगर), गणेश कदम, अभिषेक उर्फ भोर्या भिंगारदिवे, विशाल पाटोळे, करण औताडे (पत्ता माहिती नाही) व इतर 4-5 अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर हे सम्राट चौकातून जात असताना संशयित आरोपींनी त्यांना अडवले. ‘तु खूप कमी दिवसांत मोठा पैसा कमविला आहे’, असे म्हणत संशयित आरोपींनी धारदार शस्त्र, फायटर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यानंतर संशयित आरोपींनी त्यांचा गळ्यातील चार तोळे सोन्याची चैन आणि रोख नऊ हजार 200 रूपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करत आहेत.