शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
कोळपेवाडी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक असलेल्या सादीक शेख यांच्यावर मंगळवारी करण्यात आलेला चाकूहल्ला जुन्या वादातून करण्यात आला आहे. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील तिघे अल्पवयीन आहेत.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत मिळालेल्या माहितीनुसार, सादिक शेख यांचे वडील शौकत शेख शिर्डी नगरपरिषदेमध्ये बगीचा विभागाची जबाबदारी सांभाळतात. गेल्या डिसेंबर महिन्यात काही तरुणांना रस्त्यावरची नगरपरिषदेने लावलेली झाडे तोडताना अडवले होते. त्यावेळी त्याच प्रभागात राहणार्या एका पदाधिकार्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटले होते. पण कालच्या ग्रामसभेत या प्रकरणाचा उल्लेख झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून या तरुणांनी सादिक शेख यांच्यावर हल्ला केला.
11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सादिक शेख त्यांच्या शिर्डीत असलेल्या भाजीपाला दुकानावर बसलेले असताना 5 ते 6 तरुण तिथे आले आणि त्यांना शिवीगाळ करू लागले. त्यांनी जुन्या वादाचा उल्लेख करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सादिक शेख यांचे वडील शौकत शेख आणि इतर काही लोक त्यांना वाचवण्यासाठी आले, परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. या हल्ल्यात सादिक शेख यांच्या पोटात चाकूचे वार करण्यात आले. तसेच त्यांच्या डोक्यात लोखंडी वजनाने प्रहार करण्यात आला आहे. त्यांना गंभीर जखमा झाल्या असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शिरीष वमणे, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनेश आहेर व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या टीमने तातडीने हालचाल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. शौकत शेख यांच्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बुधवारी तीन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, उर्वरित तीन अल्पवयीन आरोपींना आज गुरुवारी नगर येथे बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
शिर्डीत सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारी व काही दिवसापासून शहरात नागरिकांवर सातत्याने धारदार शस्त्राने होत असलेले वार व गावठी कट्टे दाखवून सुरू असलेली दहशत यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ तसेच भाविक भयभीत झाले आहेत. वाढत असलेली गुन्हेगारी नागरिकांच्यादृष्टीने चिंताजनक ठरत आहे.