मुंबई / प्रतिनिधी
बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून गुन्हेगारी कारवाया तसेच अमली पदार्थांच्या व्यापारासाठी बालकांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल वाढत असल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विधिसंघर्षित बालकांना अटक न करता बालगृहात ठेवण्याच्या तरतुदीचा गैरफायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक १६ वर्षांखालील बालकांकडून गुन्हे घडवून आणण्यासाठी त्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बालगुन्हेगारीच्या वाढत्या प्रवृत्तीचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे. बालकांचा वापर करणाऱ्या टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर संघटित गुन्हेगारीविषयक कठोर कलमे लावण्याबाबत आणि संबंधित कायदे अधिक प्रभावी करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बिश्नोई टोळीच्या गुंडांचा पोलिसांकडून बंदोबस्त
महाराष्ट्रात बिश्नोई टोळीने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला असून खंडणीची धमकी दिल्यानंतर ही टोळी भाड्याच्या गुंडांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळ गोळीबार करून भीती पसरवण्याचे काम करते. या भाड्याच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच या टोळीत फूट पडली असून वर्चस्वासाठी त्यांची लढाई सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी प्रश्न विचारला होता. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचे समाज माध्यमात समोर आले. या प्रकरणात व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. अशा प्रकारच्या घटना आता राज्यात वारंवार घडत असल्याने व्यापारी दहशतीच्या छायेत असल्याचे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, बिष्णोई टोळीचे दोन बंधू आधीच तुरुंगात आहेत. आता त्यांचा धाकटा भाऊ आरजू बिष्णोई सक्रिय झाला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागातील धनिक व्यापाऱ्यांना व्हीपीएनचा वापर करून फोन करायचे. युपी, बिहार मधून भाडोत्री गुंडांना लाखभर रूपये देऊन या व्यापाऱ्यांच्या दुकान-घराबाहेर गोळीबार करून हूल द्यायची, असा प्रकार सुरू आहे. पण सरकार यापैकी कोणालाही सोडणार नाही. भाड्याच्या गुंडांना तर आपण पकडले आहेच. पण जे मूळ सूत्रधार बाहेरून फोन करत आहेत, त्यांनाही पकडून आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने कारवाई करण्यात येणार आहे. या टोळीतील कोणालाही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.




