पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसंदर्भातील जमीन व्यवहार आणि मंदिर निधीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. ११) नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात ‘रामरक्षा महाआरती’ करण्यात आली. शिवसेना नेते तथा नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिरलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा आणि प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच “रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलियुग आयेगा, चौकीदार चोर निकलेगा, धर्म के नाम पैसा खायेगा”, “गर्व से कहो हम हिंदू हैं”, “सियावर रामचंद्र की जय”, “पवनपुत्र हनुमान की जय” आणि “जय श्रीराम” अशा घोषणा देत फलकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.
महाआरतीनंतर बोलताना रवींद्र मिरलेकर यांनी श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. “सामान्य जनता लुटली जात असताना आता प्रभू श्रीरामांच्या नावाने जमा झालेल्या निधीवरही डल्ला मारला जात असल्याचा आरोप होत आहे,” असे ते म्हणाले. तसेच राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याचा आरोप करत त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेचाही संदर्भ दिला.
ते पुढे म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या जन्मभूमीची माती अयोध्येत नेऊन राम मंदिर उभारणीचा संकल्प केला होता. राम मंदिराच्या नावावर होणारा कथित भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.” राज्यातील प्रत्येक गावात ‘रामरक्षा आरती’ आंदोलन राबविण्याचे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
यावेळी माजी आमदार वसंत गीते, माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जे. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, सागर कोकणे, स्वाती पाटील, शैलेश सूर्यवंशी, सचिन पांडे, राहुल दराडे, बाळू कोकणे, सुभाष गायधनी, विशाल कदम, शरद चव्हाण, मंदार बर्वे, सुभाष शेजवळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीला नगरसेवकांची दांडी; ‘टायगर ऑपरेशन’च्या चर्चांना उधाण
राज्यभर ‘रामरक्षा आंदोलन’ उभारण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न सुरू असताना नाशिकमधील या महाआरतीला ठाकरे गटाच्या १५ नगरसेवकांपैकी केवळ सीमा पवार, माधुरी ढेमसे, वैशाली दळवी आणि प्रथमेश गीते हेच उपस्थित होते. इतर नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत संपर्कप्रमुख रवींद्र मिरलेकर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिकमधील अलीकडील कथित ‘टायगर ऑपरेशन’चा या अनुपस्थितीशी काही संबंध आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.




