पुणे । प्रतिनिधी
शिकवणीसाठी येणाऱ्या शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या २५ वर्षीय शिकवणी चालक तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिकवणी चालक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जायची. आरोपी तिला अश्लील चित्रफीत दाखवायचा. तू जर अभ्यास करताना चुकली तर तुला शिक्षा देईल, असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली.
या शिकवणी चालक तरुणाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.
कोंढवा भागातील एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांशी नृत्यशिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असताना पुन्हा हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.