नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले सुरु झाले आहे. यादरम्यान झालेल्या एका हल्ल्यात पुण्यातील अभियंत्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. १२ जुलै रोजी इराणने दोन जहाजांवर हल्ला केला होता. एमव्ही जीएफएस गॅलेक्सी या कंटेनर जहाजावरील थर्ड इंजिनिअर हेरंब करमरकर हे बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आखाती देशांना जोडणाऱ्या होमुर्झच्या सामुद्रधुनीत एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. हवाई हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रुमजवळ आग लागली. त्यावेळी हेरंब करमरकर इंजिन रुमजवळ होते. या नौकेवरील २४ पैकी २३ जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला.
काही मिनिटांपूर्वी फोनवर बोलणे झाले अन्
समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ला होण्याआधी त्यांचे पुण्यातील कुटुंबाशी बोलणे झाले होते. २.५० मिनिटांनी त्यांचे कुटुंबियांशी शेवटचे बोलणे झाले होते. यानंतर, हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करुन हेरंब यांचा मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादकीय : १५ जुलै २०२६ – व्यवस्थेतील क्रूर असंवेदनशीलता
गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हेरंब हे समुद्रात, नौकेवर कर्तव्य बजावत होते. कुटुंबियांशी ते नेहमी फोनवरून संवाद साधायचे. लवकरच त्यांचा समुद्रातला प्रवास संपणार होता आणि काहीच दिवसांत ते पुण्यात घरी, सुट्टीवर येणार होते, कुटुंबियांना भेटणार होते. पण त्या आधीच कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना हेरंब यांच्या मृत्यूची बातमी मिळाली.
भारताकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त
होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरुन अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पण, या युद्धाच्या झळा आता भारतीयांनाही बसत आहेत. भारताने इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून या हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीची अल बाहिया आणि मोम्बासा ही व्यापारी जहाजे होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून जात असताना इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही जहाजांवर मिळून ३० भारतीय खलाशी असल्याची माहिती देण्यात आली. “परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, “भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोहम्मद जवाद होसेनी यांना बोलावून या घटनेचा निषेध केला. पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार त्वरित थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही भारताने पुन्हा केले,”.




