पुणे । Pune
सुरुवातीला अपघाताचा आभास निर्माण करून अत्यंत कटकारस्थान रचून घडवून आणलेल्या पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. या बहुचर्चित आणि गुंतागुंतीच्या खटल्यात राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे अग्रवाल कुटुंबाला न्यायाची नवी आशा मिळाली असून, खटल्याच्या पुढील कायदेशीर वाटचालीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी कसून तपास करत तब्बल ५,०५३ पानांचे भक्कम आरोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये घटनेच्या आधी आणि नंतर संशयितांनी डिजिटल साधनांवर केलेल्या सर्चची सविस्तर माहिती तसेच विविध तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही अटक केली आहे.
केतनच्या हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयात भक्कम बाजू मांडली जावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने अग्रवाल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.
तपासातून समोर आलेला टप्प्याटप्प्याचा थरारक घटनाक्रम:
२५ मे: सिया आणि चेतन यांनी मिळून केतन अग्रवालचा काटा काढण्याचा (हत्या करण्याचा) कट रचला.
३१ मे: सिया आणि केतन पहिल्यांदा लोहगड परिसरात गेले. तेथे सियाने हत्येसाठी योग्य जागेची पाहणी (रेकी) केली.
६ जूनचा बाली प्लॅन रद्द: केतन आणि सिया यांचा ६ जून रोजी बाली (इंडोनेशिया) येथे जाण्याचा बेत होता. मात्र, तेथे एकत्र राहावे लागू नये यासाठी ४ जूनलाच हत्येचा घाट घातला गेला, जो ऐनवेळी कौटुंबिक कारणामुळे फसला. त्यानंतर मुंबई विमानतळाकडे जाताना एका फूड मॉलवर सियाने चलाखीने केतनचा पासपोर्ट चोरून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला, ज्यामुळे बालीचा दौरा रद्द झाला.
१४ जून आणि १९ जूनचा बर्थडे प्लॅन: १९ जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वर येथे रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. तत्पूर्वी १४ जून रोजी पुन्हा एकदा लोहगडावर केतनची हत्या करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो अमलात आणता आला नाही.
अत्यंत हुशारीने आणि थंड डोक्याने आखलेला हा हत्येचा कट अखेर पोलिसांच्या तपासापुढे उघडा पडला. आता उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दिग्गज वकिलांच्या प्रवेशामुळे न्यायालयात या खटल्याची सुनावणी अत्यंत प्रभावीपणे चालणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.




