Monday, September 7, 2026
HomeनगरAhilyanagar : पुणे-नाशिक आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नी आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

Ahilyanagar : पुणे-नाशिक आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नी आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग तसेच राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या प्रश्नासंदर्भात जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवारी विधानभवनात आयोजित केली आहे. या दोन्ही रेल्वे मार्गांबाबत सध्या जिल्ह्यात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग हा मूळ आराखड्यानुसार संगमनेर-देवठाण मार्गे जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.

दरम्यान, राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकर्‍यांकडून तीव्र विरोध होत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनी प्रामुख्याने बागायती स्वरूपाच्या असल्याने शेतकर्‍यांनी जमीन देण्यास असमर्थता दर्शविली आहे. यापूर्वी विविध विकास प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या असून, पुन्हा रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास त्यांची अनिच्छा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रस्तावित मार्ग रद्द करण्याची मागणीही पुढे येत आहे.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर-देवठाण मार्गेच जावा, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत तसेच राहुरी तालुक्यातील रेल्वे मार्गाला होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने पर्यायी उपाययोजनांबाबत मंगळवारी विधानभवनात होणार्‍या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ सप्टेंबर २०२६ – उच्चस्तरीय समितीची कठीण ‘परीक्षा’

0
महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरती परीक्षांमधील सातत्याने समोर येणारे गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे सत्र थांबवण्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या (सेवा) अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या...