दिल्ली । Delhi
भारतीय राजकारणाच्या पटलावर आज एक मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळाली. आम आदमी पक्षाचे (आप) तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, चड्ढा हे एकटेच भाजपमध्ये गेले नसून, त्यांच्यासोबत ‘आप’च्या तब्बल सात खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या मोठ्या फुटीमुळे आम आदमी पक्षाला आतापर्यंतचे सर्वात मोठे खिंडार पडले असून, राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राघव चड्ढा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर एकीकडे त्यांच्या समर्थकांकडून स्वागत होत असताना, दुसरीकडे विरोधकांनी चड्ढा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी पूर्वी भाजपवर केलेल्या जहरी टीकेचे जुने व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ केले जात होते. मात्र, या सर्व गदारोळात राघव चड्ढा यांनी स्वतः समोर येत एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली सविस्तर बाजू मांडली आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देताना चड्ढा भावूक दिसले. ते म्हणाले, “मी राजकारणात येण्यापूर्वी एक चार्टर्ड अकाउंटंट होतो. ती सुस्थितीतील कारकीर्द सोडून मी देशसेवेच्या भावनेने राजकारणात उतरलो. मी राजकारणात काही भौतिक सुखे मिळवण्यासाठी आलेलो नाही. ‘आप’च्या स्थापनेपासून मी एक संस्थापक सदस्य म्हणून १५ वर्षे अहोरात्र मेहनत घेतली. रक्ताचे पाणी करून पक्ष उभा केला. मात्र, दुर्दैवाने आजचा ‘आप’ पूर्वीसारखा राहिलेला नाही.”
राघव चड्ढा यांनी आपल्या जुन्या पक्षावर गंभीर आरोप करताना म्हटले की, “हा पक्ष आता काही भ्रष्ट आणि तडजोड केलेल्या व्यक्तींच्या हातात गेला आहे. ज्यांचे ध्येय राष्ट्रसेवा नसून स्वतःचे वैयक्तिक स्वार्थ साधणे हेच आहे. मला अनेकदा असे वाटायचे की, मी एका चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. मला पक्षात काम करण्यापासून जाणीवपूर्वक रोखले जात होते.”
आपला निर्णय समर्थित करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्यासमोर तीन पर्याय होते: एक तर राजकारण सोडणे, दुसरे म्हणजे त्याच कुंठीत वातावरणात राहून सुधारणेचा प्रयत्न करणे आणि तिसरे म्हणजे आपली ऊर्जा घेऊन एका सकारात्मक पक्षात सहभागी होणे. “केवळ मीच नाही, तर माझ्यासोबत सात खासदारांनी हा निर्णय घेतला आहे. एक किंवा दोन व्यक्ती चुकू शकतात, पण सात खासदार एकाच वेळी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कामाचे वातावरण दूषित झाले की तिथे राहणे अशक्य होते. म्हणूनच आम्ही देशाच्या हितासाठी हा नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी, पक्ष बदलला असला तरी लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्याचे आपले व्रत कायम राहील, असे आश्वासनही त्यांनी आपल्या मतदारांना दिले आहे. या मोठ्या घडामोडीमुळे आता ‘आप’च्या गोटात चिंतेचे वातावरण असून, आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





