टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
शासनकर्त्यांनी शेतकर्यांचे प्रश्न मिटवल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाही, असे मत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी टाकळीभान येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, शेतकरी संघटनेचे ज्येेष्ठ नेते लक्ष्मण वडले, शिवाजी नांदखिले, साहेबराव चोरमल, डॉ.आदिक आदींसह राज्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, गेल्या 12 वर्षापासून सरकारच्या शेतकर्यांबद्दल धोरणात कोणताही बदल झालेला नसल्याने शेतकर्यांच्या जीवनमानात कोणताही बदल झालेला नाही. सरकार राजकारणाच्या सोयीसाठी शेतकर्यांना लुटत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याने शेतकर्यांपुढे समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला जात असून आत्महत्येच्या मार्गावर जात आहे. शेतकर्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत.
शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकर्यांचे नेते स्व.शरद जोशी यांच्या स्मृति दिनानिमित्त 12 डिसेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्तालय कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असून शेतकर्यांच्या उसाला 7500 रुपये भाव मिळावा, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, कारखान्यातील अंतराची अट शासनाने रद्द करावी, तसेच साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करावे या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अॅड. अजित काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शेतकरी संघटना शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. तरुण शेतकरी संघटनेच्या विचाराशी सहमत असल्याने तरुण शेतकर्यांचा वाढता प्रतिसाद शेतकरी संघटनेला मिळत आहे. यामुळे शेतकरी संघटनेला बळकटी येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी लक्ष्मणराव वडले यांनी शेतकर्यांसाठी अनेक आंदोलने केली असून शेतकर्यांवरील होणारा अन्याय शेतकरी पुत्र सहन करणार नाही. शेतकर्यांना हक्काचे घामाचा दाम मिळाल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व उपस्थित मान्यवरांचा तरुण शेतकर्यांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी काही शेतकर्यांनी आपल्या समस्या मांडल्या.




