Tuesday, June 16, 2026
HomeनगरRahata : राहात्यातील कातनाल्यावर होणार जपानी तंत्रज्ञानातून ‘अप्परग्राउंड’ बाजारतळ

Rahata : राहात्यातील कातनाल्यावर होणार जपानी तंत्रज्ञानातून ‘अप्परग्राउंड’ बाजारतळ

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून हा हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून, असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

राहात्यातील आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. हा बाजार वीरभद्र मंदिरासमोरील मैदानात भरत असल्याने, परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापार्‍यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय हे मैदान बाजारासाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर-मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. हीच समस्या सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी कातनाल्याची स्वच्छता व एस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच कातनाल्यावर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन कातनाला मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

गुरुवारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांसह स्वतः कातनाल्यात उतरत पाहणी केली. कातनाला अंडरग्राउंड केल्यास त्यावर बाजारतळ विकसित करता येईल, असा मानस त्यांनी बोलून दाखवला. कातनाल्यातील दुर्गंधीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मटण मार्केटमधून निर्माण होणार्‍या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसविण्याची योजना करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे मटण मार्केटमधील जैविक कचरा जाळून नष्ट केला जाणार असल्यामुळे तो नाल्यात किंवा परिसरात साचणार नाही. त्यामुळे कचर्‍यामुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ ठेवण्यासही मोठी मदत मिळणार आहे. जपानी तंत्रज्ञानातून उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळ महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे. त्यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च येणार आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राहाता शहराचा बाजार वर्षानुवर्षे वीरभद्र मंदिरासमोर भरतो. परंतु या बाजारामुळे मंदिरातील भाविक व परिसरातील व्यावसायिकांना अडचण होते. शिवाय साकुरी व नगर-मनमाड रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा येतो. जर कातनाला अंडरग्राउंड केला, तर सुमारे एक ते दीड एकर जागा वापरायला मिळते. या कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून आराखडा तयार केला जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानाने कातनाला अंडरग्राउंड करून, त्यावर भव्य बाजारतळ उभारण्यात येणार आहे. राहात्यातील मटण मार्केटचा कचराही कायमस्वरूपी नष्ट करण्याचा प्लॅन करण्यात येणार असून, सध्याचे मटण मार्केट स्थलांतरित करण्यात येईल, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा मानसही डॉ. विखे यांनी व्यक्त केला. यावेळी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Water News : अंबोली धरण कोरडे; त्र्यंबकेश्वरवर पाणीसंकट, गंगापूरमध्ये ११.४...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला (Trimbak Nagar Parishad) पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील (Amboli Dam) उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहोचल्याने तेथील पाणीस्थिती अत्यंत चिंताजनक...