Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahata News : राहाता शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी; इंधन तुटवड्याचा...

Rahata News : राहाता शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी; इंधन तुटवड्याचा संभ्रम

राहाता | प्रतिनिधी | Rahata

इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने राहाता तालुक्यात आज मोठा गोंधळ उडाला. केवळ पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे मोठी धाव घेतली.
राहाता शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनधारकांमध्ये इंधन भरण्यासाठी चढाओढ दिसून आली. काही ठिकाणी किरकोळ वादाचेही प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल आणि डिझेलबाबतही संभ्रम वाढला आहे. यामुळेच नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांमध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले.
पेट्रोल पंप चालकांनी मात्र या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “सध्या पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा नियमित सुरू आहे,” असे पंप चालकांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्याने तात्पुरती अडचण निर्माण झाली असली तरी ती तुटवड्याची परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केल्याने वितरण प्रक्रियेत थोडा विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचा दीर्घकालीन तुटवड्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दी टाळून अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे. सध्या तरी इंधनाचा कोणताही वास्तविक तुटवडा नसतानाही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...