Thursday, May 14, 2026
HomeनगरRahata : राहात्यात बेटी बचाओचा गळा घोटणारे गर्भलिंग निदान रॅकेट पुन्हा सक्रीय

Rahata : राहात्यात बेटी बचाओचा गळा घोटणारे गर्भलिंग निदान रॅकेट पुन्हा सक्रीय

राहात्यात पुन्हा एकदा रक्तरंजित रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

राहाता |प्रतिनिधी| Rahata

माणुसकीला काळिमा फासणारे आणि बेटी बचाओसारख्या राष्ट्रीय मोहिमांना हरताळ फासणारे एक अत्यंत संघटित गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या रॅकेट राहाता तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काही वैद्यकीय आणि तथाकथित आरोग्य केंद्रे अगदी छुप्या पद्धतीने या काळ्या धंद्यात गुंतले असून त्यांचे जाळे केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, शेजारील राज्यांपर्यंत विस्तारले आहे. तातडीने कठोर कारवाई न झाल्यास या तालुक्याच्या माथी स्त्री भ्रूणहत्या केंद्राचा असा कायमचा ठपका बसण्याची भीती आहे.

- Advertisement -

या रॅकेटचा मुख्य उद्देश, कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित असलेली गर्भलिंग निदान चाचणी करणे आणि त्यानंतर अनैतिकरीत्या गर्भपात करणे हा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने चालते. यात काही स्थानिक दलाल सक्रिय असून, त्यांचे मजबूत नेटवर्क ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधते. केवळ मुलाची इच्छा असलेल्या किंवा सामाजिक दबावाखाली असलेल्या जोडप्यांना हे दलाल राहाता तालुक्यात गुप्त ठिकाणी चाचणीची सोय उपलब्ध असल्याचे सांगतात. शहरापासून दूर असलेल्या फार्म हाऊसवर किंवा एखाद्या जुन्या, कमी वर्दळीच्या क्लिनिकमध्ये चाचणी आणि शस्त्रक्रिया केली जात आहे. कायद्याचे उल्लंघन होत असल्याने, सामान्य सोनोग्राफी किंवा गर्भपाताच्या तुलनेत हे दर अनेक पटीने जास्त असतात, ज्यामुळे गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची लूट केली जाते.

चाचणीत गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित डॉक्टर किंवा कर्मचारी महिलांवर गर्भपातासाठी मानसिक दबाव टाकतात आणि त्यांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यापूर्वी कारवाई झालेल्या केंद्रांनी आता आपले स्वरूप बदलले आहे. तीच केंद्रे आणि तेच लोक आता वेगळ्या नावांनी आणि नवीन तंत्राचा वापर करून हा धंदा पुन्हा सुरु करत आहेत. ही केंद्रे मुख्य रस्त्यापासून दूर आणि कडक गोपनीयतेत चालवली जात आहेत. गेल्या काही महिन्यांत तालुक्याच्या सीमाभागात उघडलेल्या नवीन वैद्यकीय सल्ला केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यातील काही डॉक्टर उच्च शिक्षित असून, त्यांनी आपल्या ज्ञानाचा गैरवापर करून सामाजिक गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट होते.

राहाता तालुका भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमेवर असल्याने, याचा गैरफायदा हे रॅकेट घेत आहे. ज्या राज्यांत पीसीपीएनडीटी (गर्भधारणेपूर्वी आणि प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान) कायद्याची अंमलबजावणी कठोर आहे, तेथील एजंट्स या महिलांना राहाता तालुक्यात घेऊन येतात, कारण येथे व्यवस्था पक्की आहे आणि काम हमखास होते. बसस्थानके आणि रेल्वे स्टेशनवर संशयित एजंट्सचा वावर वाढला असून, यामुळे राहाता तालुक्याचे नाव गर्भलिंग निदान केंद्राचा ठपका बसून विनाकारण बदनाम होत आहे.

प्रशासन अर्थपूर्ण व्यवहारातून डोळेझाक करत आहे का? हा गोरखधंदा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांमध्ये असूनही, स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग आणि पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करणारी समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्लक्षामागे अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. रॅकेट चालवणार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन कारवाई टाळली जात असल्याची नागरिकांची तीव्र भावना आहे. शिवाय, काही केंद्रांना स्थानिक राजकीय नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांना कारवाई करताना राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याचेही बोलले जात आहे.

पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट, 1994 नुसार, गर्भलिंग निदान करणे हा गंभीर गुन्हेगारी कृत्य असून, यात दोषी आढळणार्‍यांना 3 ते 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, संबंधित डॉक्टरचा व्यवसाय करण्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक समतोलाला धोका निर्माण करणार्‍या या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी, पोलीस अधीक्षकांनी आणि आरोग्य विभागाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री चौकशी न करता, या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी संयुक्त कृतीदल तयार करण्याची आणि ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुप्त ग्राहक पाठवून या रॅकेट चालवणार्‍यांना रंगेहाथ पकडल्यास, हे दुष्टचक्र थांबेल आणि राहाता तालुक्याला लागलेला हा काळा डाग कायमस्वरूपी धुवून काढता येईल. नागरिकांनी भीती न बाळगता प्रशासनाला माहिती देऊन समाजाचे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचवावे, असे आवाहन केले जात आहे.

5 डिसेंबर 2025 रोजी गर्भलिंग निदान विरोधी पथक राहाता शहरात आल्याचे विश्वसनिय वृत्त असून पथक ज्या रूग्णालयाची तपासणी करून गेले त्याच रूग्णालयात सायंकाळी 5 वाजेनंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. याचा अर्थ स्पष्ट आहे. हे रॅकेट इतके मोठे आहे की, प्रशासनालाही ते विकत घेऊ शकते. या गंभीर दुर्लक्षामागे मोठा अर्थपूर्ण व्यवहार झाला असण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल व्हायला हवा.

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ मोठे निर्णय; नाशिक...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...