Tuesday, September 29, 2026
HomeनगरRahata : राहाता तालुक्यात वाळूतस्करांवर पोलिसांचा छापा

Rahata : राहाता तालुक्यात वाळूतस्करांवर पोलिसांचा छापा

30 लाख 40 हजारांच्या मुद्देमालासह दोन डंपर जप्त

राहाता |प्रतिनिधी| Rahata

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहाता तालुक्यात मोठी धडक कारवाई केली आहे. पुणतांबा-शिर्डी रोडवरील नपावाडी शिवारात सापळा रचून पोलिसांनी तब्बल 30 लाख 40 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन डंपर जप्त केले असून या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने वाळू माफिकांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशाची कडक अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, योगेश कर्डिले व दीपक जाधव यांचे विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले होते. दरम्यान 12 ऑगस्ट 2026 रोजी हे पथक राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना नपावाडी गावच्या शिवारातून पुणतांबा ते शिर्डी जाणार्‍या मार्गावर विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती खबर्‍यामार्फत मिळाली.

या माहितीची खात्री पटवून घेत पथकाने तातडीने नपावाडी चौफुला येथे सापळा रचला. काही वेळातच दोन पिवळ्या रंगाचे डंपर तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवले. वाहन चालकांना पोलीस पथक व पंचांची ओळख सांगून दोन्ही वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू मिळून आली. चालकांकडे वाळू वाहतुकीच्या अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे व परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहन चालक विशाल नितीन कोल्हे (वय 21, रा. गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता) आणि दौलत एकनाथ सोनवणे (वय 40, रा. केलवड, ता. राहाता) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 15 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक एमएच-17 सीव्ही-7716), 20 हजार रुपये किमतीची वाळू, 15 लाख रुपये किमतीचा आणखी एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा डंपर आणि 20 हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याची चौकशी केली असता हे वाहन चालक वाहन मालक कोते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, रा. शिर्डी) आणि चौधरी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही, रा. नांदुर्खी, ता. राहाता) यांच्या सांगण्यावरून वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणाबाबत राहाता पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमधील इतर जणांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास राहाता पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...