अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कॉक्रोज जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छात्रो की गुंज असे उपक्रम हाती घेऊन राहुल गांधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत. लोकसभेमध्ये सलग तीनवेळा पराभव झाल्याने आणि जनतेतील त्यांची प्रतिमा खराब झाल्यानेच राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उपयोग करून घेत आहेत, असा आरोप नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.
नीट परीक्षेच्या माध्यमातून जे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक वेगळा प्रस्ताव देणार आहोत. या परीक्षाच राज्य सरकारने घ्याव्यात, अशी मागणी प्रस्तावद्वारे आपण करणार आहोत, असे ना. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. शनिवारी नगरमध्ये बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारने नीटची परीक्षा घेतल्यामुळे दोन फायदे होतील, शासकीय महाविद्यालय व अनुदानित महाविद्यालय यांची जबाबदारी वाढेल, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे लागेल. त्याचबरोबर कोचिंग क्लासेसच्या नावाखाली समाजात जी लूट सुरू आहे, जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे, ती थांबेल, असे सांगताना ना. विखे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमावर जोरदार हल्लाबोल केला.
नीट परीक्षा आज होत आहेत का? परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उपयोग स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गांधी करून घेत आहेत. यापूर्वीही सरकार आले, त्यावेळी ते झोपले होते का?, आत्ताच यांना या गोष्टी कशा सुचतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ते उपयोग करून घेत आहेत, असा टोला ना. विखे पाटील यांनी लगावला. छात्रों की गुंज या कार्यक्रमात पैसे देऊन लोक आणले जात असल्याचा आरोप होत आहे, या संदर्भात ना. विखे पाटील म्हणाले, पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याची जी चर्चा आहे ती फारच गंभीर आहे. गांधी यांच्या अशा कार्यक्रमात कितीही विद्यार्थी सहभागी झाले तरी या विद्यार्थ्यांना राहुल गांधी काय आहेत ते माहित आहे. त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही हे वास्तव आहे.
पत्रकार थोरात यांच्यावर झालेला हल्ला गंभीर
नगरमधील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे आश्चर्य वाटते. शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील अवैध धंद्यावर प्रशासनाचा अंकुश राहिला नाही, हेही स्पष्ट होत आहे. अवैध धंदे समोर आणणे हे पत्रकारांचे कामच आहे. अशा परिस्थिती होणारी हल्ले गंभीर आहेत. आरोपी अद्याप मोकाट आहेत. आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहिती असतानाही ते फरार झाले. ते फरार होण्यात पोलिसांचा हातभार लागला का हेही तपासून पाहू, असेही ते म्हणाले.




