राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी ऐनवेळी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असताना, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी तनपुरे यांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अनुभवी नेते असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसमोर कडवे आव्हान उभे करू शकतात असे राजकीय वर्तुळात मानले जात होते. पण भाजपाने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का दिला. शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गळाला लावले. त्यामुळे शरद पवार गटाला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर कर्डिले यांना मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे येत्या 23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी राहुरीत नाट्यमय घडामोडींनी वेगळे वळण घेतले. सोमवारी सकाळीच भाजपने रणनीती आखत निर्णायक पाऊल उचलले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट संपर्क कार्यालयात जात तेथे प्राजक्त तनपुरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. या भेटीदरम्यान चव्हाण आणि विखे-पाटील यांनी मोबाईलवरून तनपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले.
मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समजते. सूत्राच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तनपुरे यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. तसेच डबघाईला आलेल्या राहुरी सहकारी साखर कारख्यान्याच्या पुनुरुज्जीवनासाठी तनपुरेंना राज्य सरकारची मदत हवी आहे. साखर कारखान्याच्या प्रकरणात मदत करण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती हाती आली आहे.
या निर्णयाने शरद पवार गटाची मोठी अडचण झाली. तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात, याची कल्पना असल्याने शरदचंद्र पवार गटाने पर्यायी तयारी ठेवली होती. मुंबई येथून प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे यांचे दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले होते.
दुपारी अडीचच्या सुमारास गोविंद मोकाटे यांनी जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यावेळी तनपुरे यांच्या माघारीची अधिकृत पुष्टी झाली. मोकाटे हे राहुरी पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. या सर्व घडामोडींमुळे राहुरी पोटनिवडणुकीतील राजकीय रंगत अधिकच वाढली असून आता अक्षय कर्डिले यांच्या समोर गोविंद मोकाटे, रावसाहेब खेवरे, साहेबराव म्हसे, संतोष चोळके, सविता शेटे यांचे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तनपुरे राहुरीत जे म्हणतील तो विकास करु – रवींद्र चव्हाण
प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जो म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल, महायुती सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक राहील. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
प्राजक्त तनपुरेंची माघार, शशिकांत शिंदे म्हणाले…
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी इच्छा दाखवली नाही, आम्ही 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, त्यामुळे आम्ही गोविंदराव कोकाटे या सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली. प्राजक्त तनपुरे भाजपकडे बोलणी करत नव्हते, भाजपच्या नेत्यांनी त्यांना संपर्क साधला. कदाचित त्यांना वाटत असेल की त्यांचा विजय कठीण असेल. ते निवडणुकीला का उभे राहिले नाहीत याबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राहुरी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिले.
भाजपा नेत्यांकडून पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती – तनपुरे
भाजपच्या नेत्यांनी आजच्या भेटीत पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. तालुक्यातील प्रश्नांसाठी निवडणूक लढवावी हा माझा उद्देश होता.
राहुरीतील रस्त्यांची समस्या, एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.




