Monday, November 9, 2026
HomeनगरRahuri : राहुरीत भगर खाल्ल्याने 10 ते 15 जणांना विषबाधा

Rahuri : राहुरीत भगर खाल्ल्याने 10 ते 15 जणांना विषबाधा

मळमळ, उलट्यांमुळे रुग्णालयांत उपचार सुरू; एकाला नगरला हलविले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नवरात्रौत्सवानिमित्त उपवासासाठी भगर खाल्ल्यानंतर राहुरी परिसरातील सुमारे 10 ते 15 जणांना विषबाधेसदृश त्रास सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णांना राहुरी शहरातील तसेच राहुरी फॅक्टरी परिसरातील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. सध्या नवरात्रौत्सव सुरू असल्याने अनेक महिला व पुरुष नऊ दिवसांचे उपवास करतात. उपवासाच्या काळात भगर हा प्रमुख खाद्यपदार्थ म्हणून वापरला जातो. मात्र, राहुरी परिसरात भगर खाल्ल्यानंतर अनेकांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

राहुरी शहर, येवले आखाडा, राहुरी स्टेशन तसेच वाघाचा आखाडा येथील सुमारे 10 ते 15 जणांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्रास जाणवू लागल्यानंतर संबंधितांनी उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेतली. काही रुग्णांवर राहुरी शहरात, तर काहींवर राहुरी फॅक्टरी परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. येवले आखाडा येथील प्रा. बाळासाहेब जगन्नाथ जाधव, त्यांच्या मातोश्री सुमनबाई जगन्नाथ जाधव यांच्यासह अनेकजण राहुरीत व राहुरी फॅक्टरी येथे उपचार घेत असून वाघाचा आखाडा येथील सुरेश पटारे यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

नवरात्रौत्सवात उपवासासाठी भगर, शेंगदाणे, बटाटे आदी पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. अशा वेळी अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि वापराची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. राहुरी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे उपवासासाठी वापरण्यात येणार्‍या भगरीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिक चर्चेत निकृष्ट दर्जाच्या भगरीमुळे त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी विषबाधेचे नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, संबंधित भगरीचा नमुना तपासण्यात आला आहे का, तसेच या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. विषबाधेचे नेमके कारण शोधून संबंधित अन्नपदार्थाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. या घटनेमुळे उपवासासाठी भगरीचा वापर करणार्‍या नागरिकांनी खरेदी करताना उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत आणि साठवणुकीकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत नागरिकांकडून विचारणा केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी घटनेची दखल घेऊन भगरीच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Rahata : कोल्हारमध्ये भर बाजारपेठेत गोडाऊनला आग

0
कोल्हार |वार्ताहर| Kolhar एकीकडे दीपावलीच्या सणाच्या धामधुमीत सर्वजण असताना कोल्हार बुद्रुक येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ भर मार्केटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक एका...