Friday, May 1, 2026
HomeनगरRahuri : राहुरी तालुक्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Rahuri : राहुरी तालुक्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

71 लाखांचा मुद्देमाल जप्त || अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघे तर सोलापूरमधील एकजण ताब्यात

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरीच्या पोलीस पथकाने शनिवार 28 जून रोजी मध्यरात्री शहर हद्दीत 2 लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर टेंभुर्णी येथील बनावट नोटा छापण्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून आरोपींच्या ताब्यातून 70 लाख 73 हजार 923 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन दुचाकीवरुन राहुरीकडे येत आहेत, अशी गुप्त माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना शनिवारी रात्री 11 वाजे दरम्यान मिळाली. तेव्हा ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे एमएच-45 वाय 4833 क्रमांकाच्या दुचाकीवर पप्पू ऊर्फ प्रतीक भारत पवार, (वय 33) रा. अर्जुननगर, ता. करमाळा जि. सोलापूर, तसेच राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय 42) आणि तात्या विश्वनाथ हजारे (वय 40) दोघे रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर हे तीन इसम आले. तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले.

पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. अ‍ॅक्सीस बँक राहुरी शाखेचे व्यवस्थापक कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड करून कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवतो असे सांगीतल्याने राहुरी पोलीस पथकाने टेंभुर्णी येथील शितलनगर परिसरातील समाधान गुरव यांच्या इमारतीत भाड्याने घेतलेले घर गाठले.

तेथे झेरॉक्स करण्याची मशीन व प्रिंटर, कटिंग करण्याची मशीन, नोटा बनवण्यासाठीचा कागद, नोटा मोजण्याचे मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट (सर्व मशिनरीची किंमत सुमारे 5 लाख रुपये), 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल, ज्याची किंमत 37 लाख 50 हजार रुपये, 200 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 44 बंडल, ज्याची किंमत 8 लाख 80 हजार रुपये, पाचशे रुपयांच्या प्रिंट केलेल्या नोटा, परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स (18 लाख रुपये किमंतीचे) असा एकूण 70 लाख 73 हजार 920 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. 724/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 179, 180, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाणे, जिल्हा. सोलापूर येथे गु.र.न. 503/2022 प्रमाणे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यात आरोपी 22 महिने तुरुंगात होते.
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदिप ठाणगे, कॉन्स्टेबल सतीश कुर्‍हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदीम शेख यांच्या पथकाने केली.

सदर पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार श्री. साळवे, शिंदे, कॉन्स्टेबल श्री. पाखरे यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...