राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी खुर्द बरोबरच राहुरी शहरातही राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचा साठा शहरातील भरपेठेत बिनधास्त ठेवला जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही संबधित प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राहुरी शहरासह तालुक्यात बंदी असलेल्या गुटख्याची जोमात विक्री सुरू आहे. राहुरी खुर्द व राहुरी शहरातील एक व्यापारी यांनी या गुटख्याचे तालुक्यात वितरण करण्यासाठी काही पंटर नेमले आहेत. राहुरी खुर्द येथील व्यापार्याचे गोदाम तर सर्वश्रुत आहे. मात्र राहुरी बसस्थानकाच्या पुर्वेला भरपेठेत असलेल्या एका खाणावळीतच या गुटख्याची साठवणूक होत असल्याचे शहरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
शासनाने तरुण पिढी व्यसनापासून दूर जातानाच तरुणपिढी कर्करोगासारख्या भीषण आजाराला बळी पडू नये, म्हणून जवळपास दहा वर्षापासून राज्यात गुटखा विक्री बंद केली आहे. यातून शासनाला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असला तरी सर्व नुकसान सहन करून शासनाने हा निर्णय केला आहे. तरीही राहुरी शहर व खेड्याच्या सर्व भागांत गुटखा शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने सर्वत्र खुला झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचप्रमाणे सर्रासपणे ग्रामीण व शहरी भागात टपरी, किराणा दुकान आदी ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री होत असताना शासनाची नियम पाळणारी मंडळी उघड्या डोळ्यांनी हे वास्तव पाहत आहे. यातून अनेक तरुण या गुटख्याच्या आहारी गेले आहेत.
शालेय मुलांचाही या गुटखा सेवनात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत असून आपण नेमकी आपली तरुणाई कोठे घेऊन जात आहोत? आपल्या तुंबड्या भरण्यासाठी राज्याचे, देशाचे व परिणामी युवा भारताचे स्वप्न असणार्या तरुणाईला कुठे घेऊन जाऊ पाहतोय याचाही विचार यंत्रणेकडून होणे गरजेचे असून सत विवेक बुद्धी हरविलेल्या शासकीय यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. शासकीय अन्नभेसळ प्रतिबंधक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणेला मात्र, ही सर्रास सुरू असलेली विक्री दिसत नाही का? असा सवाल सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.