Monday, December 2, 2024
HomeनगरRahuri Politics : कर्डिलेंच्या विजयाने बदलले राहुरी मतदारसंघाचे राजकीय चित्र!

Rahuri Politics : कर्डिलेंच्या विजयाने बदलले राहुरी मतदारसंघाचे राजकीय चित्र!

दत्तात्रय तरवडे

विधानसभा निवडणुकीत राहरी नगर-पाथर्डी मतदारसंघात आ. प्राजक्त तनपुरे आणि माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले या पारंपरिक विरोधकांमध्ये राजकीय सामना अटीतटीचा ठरला. या सामन्यात कर्डिलेंनी तनपुरे यांना तब्बल ३४ हजार मतांनी मात दिली.

- Advertisement -

त्यामुळे आता राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील सर्वच राजकीय समिकरणे बदलणार आहेत. कर्डिलेंच्या विजयामुळे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करीत असताना तनपुरेंच्या गटात मात्र शांतता पसरली होती. विजयाने एकीकडे कर्डिलेंचा आत्मविश्वास दुणावला तर दुसरीकडे ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ तनपुरे गटाला नडला का, याची चर्चा पुढील काही दिवस रंगणार आहे.

राहुरीत प्राजक्त तनपुरेंच्या होमपीचवर कर्डिलेंनी मताधिक्यात मात दिल्याने सुरक्षित वाटणारी निवडणूक तनपुरे यांच्यासाठी कठीण ठरली. विकास कामांचा रतीब, प्रभावी प्रचार यत्रंणा, मतदारांशी थेट संपर्क असूनही त्यांची राजकीय मोहीम अपयशी ठरली. निळवंडेचे पाणी, वांबोरी चारीचे हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी तनपुरे आणि कर्डिले दोघेही श्रेय घेत होते. हा पराभव तनपुरे गटासाठी अंतर्मुख करणारा ठरला.

महायुतीने लाडकी बहीण, लाडका भाऊ, वीजबील माफी, शेतकरी सन्मान योजना, दूध अनुदान, पीक विमा, संजय गांधी निराधार योजना अशा अनेक योजनांचा वर्षाव करून लाभार्थी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली होती, लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून महायुतीने काही धडा घेतलेला होता. त्यावर उपाययोजना केल्या, त्याचा फायदा त्यांना या मतदारसंघातही मिळाला.

लोकसभा निवडणूक व आत्ताची परिस्थिती यात मोठा बदल झाला होता. ‘वोट जिहाद’ विरूद्ध एक है तो सेफ है’चा नारा महायुतीने दिला होता. ‘व्होटजिहाद’ त्याची मदत मतदारसंघात महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. लोकसभा निवडणुकीत महायुती गाफील राहिली त्याचा फटका बसला होता. त्या चुका विधानसभा निवडणुकीत दुरुस्त केल्या. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, यादृष्टीने प्रबोधन मंचाने विशेष काम केले.

प्रबोधन मंचाने मतदान कोणाला करावे, हे सांगितले नाही पण लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, हा आग्रह धरला. त्यामुळे मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा तीस हजार मतदान वाढले. २०१९ च्या निवडणुकीत दोन लाख दहा हजार मतदान झाले होते. त्यात एकतीस हजारांची वाढ झाली होती. या वाढीव मतदान टक्केवारीने मतदानोत्तर चाचणीचे सर्व अंदाज चुकवले. वाढीव मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मिळाला.

गत निवडणुकीत कर्डिले यांना ८८ हजार मते मिळाली होती. आमदार प्राजक्त तनपुरे यांना १ लाख २० हजार मते मिळाली होती. खरे तर भारतीय जनता पक्षातून अंतर्गत मतभेदाची रसद प्राजक्त तनपुरे यांना यावेळी मिळणार नव्हती. लोकसभा निवडणुकीत यावेळी पडद्याआड कोणताही समझोता चर्चेत नव्हता. त्यामुळे वीस पंचवीस हजार मतांची घट त्यांना बसणे अपेक्षित होते. तशी ती बसली. त्यामुळे चाळीस हजार मतदानात अधिक मते जो घेणार तो राहरीचा आमदार होणार होता. त्यात शिवाजीराव कर्डीले यांनी बाजी मारली. अंतर्गत गटबाजीचा फटका बसणार नाही, अशी भाजपने व्यवस्था केली होती. त्यातच धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा महायुतीला झाला. या पाच वर्षात मतदारसंघात सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या दोन घटना घडल्या होत्या.

उंबरे येथील ‘लव्ह जिहाद’ गाजले. राहरीच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा या प्रकरणी निघाला होता. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले व तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील बहुसंख्य हिंदू समाजाचे बाजूने उभे राहिले. अर्थात त्याचा फायदा डॉ. सुजय विखे पाटील यांना मिळाला नाही. कर्डिले यांना मात्र हा फायदा मिळाला. गुहा येथील कानिफनाथ मंदीर बाद पुढे आला. या दोन्ही प्रकरणात प्राजक्त तनपुरे यांची भूमिका त्यांना अडचणीत आणणारी ठरली. लोकसभा निवडणुकीत खा. निलेश लंके यांच्या विजयी मिरवणुकीत वेगळा गुलाल उधळला गेला. या घटनेनंतर या प्रचारात समाजमाध्यमात परत राहुरीत याची पुनरावृत्ती करायची काय? असा प्रश्न उपस्थित केला गेला. या प्रकरणांमध्ये बोटचेपी भूमिका अडचणीत आणते आहे आणि विरोधक नेमका याचाच फायदा घेत आहेत, हे लक्षात आल्यावर मी देखिल हिंदू आहे, मी तुळजाभवानीचे दर्शन करुन अर्ज दाखल करीत आहे, असा दावा करत प्राजक्त तनपुरे यांनी विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला.

पण समाजाने हिंदुत्वासाठी लढवय्ये नेतृत्व शिवाजी कर्डीले यांच्या निमित्ताने स्वीकारले, हे निकालातून दिसून आले. यावेळी समाज माध्यमाद्वारे लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. परिणामी विकासकामे, स्थानिक प्रश्न याचा प्रचारात जोर असला तरी मतदारांना तो भावला नाही. राज्यात सत्तापालट झाल्यावर कर्डिले मतदारसंघात सक्रीय झाले होते. सत्ताधारी सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजनांना गती मिळाली. संजय गांधी निराधार योजनेचे अडीच हजार लाभार्थी या काळात बाढले. याशिवाय बेरजेचे राजकारण करीत राहरी तालुक्यामध्ये स्वर्गीय पद्मभूषण माजी खासदार कै. बाळासाहेब विखे पाटील यांचे निष्ठावंत असणारे व विकास मंडळाचे ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील यांनी कर्डिलेंना ताकद देण्याचे काम केले. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राजूभाऊ शेटे, सुरेंद्रनाथ थोरात यांना कर्डिले यांनी सोबत घेतले.

प्राजक्त तनपुरे यांनी तालुका विकास मंडळाचे चाचा तनपुरे यांना बरोबर घेत बेरजेचे राजकारण केले पण त्याचा अपेक्षित लाभ मिळाला नाही. विकास कामांचा मुद्दा खरे तर प्रभावी ठरणे अपेक्षीत होते, पण त्यापेक्षा राज्यस्तरीय प्रचाराचे मुद्दे अधिक प्रभावी ठरले. या मतदारसंघात कर्डिले चौथ्यांदा निवडणूक लढवीत होते. मतदारसंघातील जनता त्यांना व ते मतदारांना परिचयाचे आहेत. ते गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते कमी शिकलेले आहेत. स्थानिक नाहीत. प्राजक्त तनपुरे सुशिक्षित, स्थानिक, दूरदृष्टीचे नेते आहेत असे मुद्दे तनपुरे समर्थकांनी प्रचारात आणले. पण मतदारांवर ते प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले, हे निकालातून सिद्ध झाले.

लांब पल्ल्याचे नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांचेकडे पाहिले जात होते. पाच वर्षात मतदारसंघातील जनमताचा आधार व्यापक करता करता त्यांच्या विरोधात जनमत कधी तयार झाले, हे खरेतर त्यांच्याही लक्षात आले नाही. मंत्रीपदाचा वापर करुनही त्यांना जनाधार वाढवता आला नाही. अल्पसंख्याक मतापेक्षा बहुसंख्याकांच्या मतांचा आधार यावर कर्डिले यांनी जोर दिला, याच फॅक्टरने त्यांना आमदार केले. राहुरीत गतवेळी प्राजक्त तनपुरे यांनी चांगले मताधिक्य घेतले होते. यंदा त्यांना राहीत रोखण्यात कर्डिले यशस्वी ठरले. पाथर्डी व नगर तालुक्यातील गटात कडॉलचा प्रभाव होताच. तो यंदाही कायम राहिला.

विखे-कर्डिलेंचा प्रभाव वाढला

राहुरीतील मतदानाची तिरंगी प्रभावी लढतीत मतविभागणी यंदा झाली नाही. सरळ लढतीत तनपुरे यांना होम ग्राउंडवर रोखण्यात कर्डिले यशस्वी ठरले. मी पाय जमिनीवर असलेला नेता आहेत. कायम जनतेत राहणारा माणूस आहे. हा विजय हिंदुत्वाचा विजय आहे, अशी आ. शिवाजी कर्डीले यांची प्रतिक्रिया बरीचशी बोलकी आहे. प्रचारात शरदचंद्र पवार व खासदार निलेश लंके यांच्या प्रचार सभा झाल्या. तर महायुतीतर्फे पंकजा मुंडे, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या कर्डिले यांचा विजय विखेंसाठी राजकीयदृष्ट्या आवश्यक होता. त्यामुळे विखेंची भाजपातील प्रतिमा अधिक उंचावणारी ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या