मुंबई । Mumbai
अलिकडच्या काळात लग्नापूर्वी ‘प्री-वेडिंग शूट’ करण्याची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मात्र, हे शूट करताना आपण कोणत्या ठिकाणचे पावित्र्य जपतोय, याचे भान अनेकदा विसरले जाते. नुकताच दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची चित्रफीत (व्हिडिओ) समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. रायगड ही केवळ वास्तू नसून ते कोट्यवधी शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दुर्गराज रायगडाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीला नियमच लावले पाहिजेत का? आपली नैतिक जबाबदारी आणि सामाजिक भान काही शिल्लक आहे की नाही?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर जोडपी दर्शनासाठी गडावर येतात, यात काहीच वावगे नाही. मात्र, सध्या अशा भेटींचे रूपांतर ‘इव्हेंट’मध्ये होताना दिसत आहे. महाराजांचे राजसदर आणि समाधीस्थळ ही पवित्र जागा आहे. अशा ठिकाणी सोशल मीडियावर केवळ प्रदर्शन करण्यासाठी नाटकी आणि अनावश्यक गोष्टी करणे अत्यंत चुकीचे आहे. रायगड हे एक ऐतिहासिक प्रेरणास्थळ आहे, त्याला केवळ पर्यटनस्थळ समजून तिथे खासगी इव्हेंट करणे निषेधार्ह आहे.
गडावरील खासगी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे (ASI) नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. या नियमांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाला देण्यात आल्या असल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. तथापि, केवळ नियमांवर अवलंबून न राहता, शिवभक्त म्हणून आपण स्वतःहून सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी तरुणाईला केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक किल्ल्यांवर अशा प्रकारचे चित्रीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. गडकोट हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून तिथे पर्यटनाच्या नावाखाली होणारा स्वैराचार थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता शिवप्रेमींकडून जोर धरत आहे. या व्हायरल व्हिडिओमधील जोडप्यावर आणि चित्रफिती करणाऱ्या टीमवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




