Thursday, May 7, 2026
Homeनगरपावसाचा जोर…धरणसाठ्यात झपाट्याने वाढ; भंडारदरातून पाणी सोडले

पावसाचा जोर…धरणसाठ्यात झपाट्याने वाढ; भंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रातील घाटघर, रतनवाडी आदी भागांत आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7378 दलघफू (66.84 टक्के) तर निळवंडेचा 4634 दलघफू (55.64 टक्के) झाला असून, भंडादरा धरणातून 1903 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

- Advertisement -

गेल्या तीन-चार दिवसांपासून घाटमाथ्यावर आषाढ सरींनी चांगलाच जोर धरल्याने धरणांत नवीन पाण्याची आवक कमालीची वाढली आहे. डोंगरदर्‍यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी धरणाकडे झेपावत आहे. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत (गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात 437 दलघफू तर निळवंडेत 293 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे.

अजूनही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज घेऊन पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने जलाशय परिचलन सूचीनुसार भंडारदरा धरणातून 1903 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. यामळे नदी चांगलीच प्रवाही झाली आहे. दरम्यान, पाण्याचा प्रवाह कमी-अधिक होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दारणा पाणलोटात मुसळधार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

इगतपुरी आणि घोटी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने भावली धरण 100 टक्के भरले. या धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. दारणा धरणाच्या परिसरातही पावसाचा जोर असल्याने पाण्याची मोठी आवक झाली आहे. दारणातील विसर्ग 2690 क्यूसेकवरून 4214 क्यूसेक करण्यात आला आहे. गंगापूर धरणाचा विसर्ग 2132 क्यूसेकवरून 3716 क्यूसेक करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील 1434 दलघफू क्षमतेचे भावली काल दुपारी 3 वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला. हे धरण यंदा लवकर भरले. त्यातून 26 क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. या धरणातील विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने झेपावला आहे. काल दिवसभर दारणा धरणाच्या भिंतीजवळ जोरदार पाऊस झाला. याशिवाय इगतपुरी आणि घोटी परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल सकाळपर्यंत इगतपुरीला 120 मिमी, घोटीला 91 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासात दारणा धरणात 318 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे 2690 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग काल सायंकाळी 1524 क्यूसेकने वाढवून 4214 क्यूसेक करण्यात आला. दारणा समूहातील वाकी आणि भाम यांच्याही पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काल सकाळी दारणा धरणातून एकूण 4.1 टीएमसीचा विसर्ग करण्यात आला.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात मंगळवारी झालेल्या त्र्यंबकमध्ये 90 मिमी आणि आंबोलीमध्ये 72 मिमी पावसाची नोंद झाली होती. हे पाणी गंगापूरमध्ये दाखल झाल्याने 2132 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग काल दुपारी 12 वाजता वाढवून 3716 क्यूसेक करण्यात आला. काल गंगापूरच्या पाणलोटात पावसात फारसा जोर नव्हता. काल दिवसभरातील 11 तासात गंगापूरच्या पाणलोटात गंगापूरला 1 मिमी, कश्यपी 5 मिमी, गौतमी 7 मिमी, त्र्यंबक 26 मिमी, आंबोली 20 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरमध्ये 60.42 टक्के पाणी साठा आहे. गंगापूरमधून काल सकाळपर्यंत एकूण 2.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला आहे. गौतमी गोदावरीत 55.57 टक्के, कश्यपीत 69.90 टक्के असे साठे झाले आहेत. भोजापूर धरण 100 टक्के भरले आहे. त्यातून 76 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. पालखेड धरणात 68 टक्के पाणी साठा आहे. त्यातून 1500 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

खाली नांदुरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 15,775 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. काल सकाळपर्यंत या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 14.1 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खाली जायकवाडीत उपयुक्त साठा काल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 45.56 टक्के इतका झाला होता. यावेळी 9629 क्यूसेकने विसर्ग दाखल होत होता. या जलाशयात मृतसह एकूण साठा 61 टीएमसी इतका झाला होता, तर उपयुक्त साठा 34.9 टीएमसी इतका झाला होता.

म्हाळुंगी नदीत विसर्ग

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील अवर्षणप्रवण निमोण भागाला वरदान ठरलेले म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बुधवारी (दि.2) सायंकाळच्या सुमारास पूर्ण क्षमतेने (100 टक्के) धरण तुडूंब भरले आहे. भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर पट्ट्यातील म्हाळुंगी नदीवर असलेल्या भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफूट इतका असतो. पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भोजापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. धरणाच्या पाण्यावरच सिन्नर व संगमनेर भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे धरण भरण्याची सर्वांना अपेक्षा होती. पश्चिम पट्ट्यात विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे.

गेल्या काही दिवसांपासून उगमस्थानात जोरदार पाऊस सुरु झाल्याने नदीला पहिल्यांदा पूर आला होता. त्यामुळे भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात देखील सातत्याने वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मंगळवारी सायंकाळी धरणात 98 टक्के पाणीसाठा झाला होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास 483 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

धरणातील पाणीसाठा तसेच सांडव्याद्वारे वाहणारे पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी सुरु होती. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांची चिंता मिटली आहे. तर पूर्व भागातील लाभक्षेत्रात चारीद्वारे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : टरबूज परत केल्याच्या रागातून सावेडीत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी घडली. विकत घेतलेले टरबूज...