Tuesday, December 10, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा पाणलोटातून पाऊस गायब

भंडारदरा, मुळा पाणलोटातून पाऊस गायब

दारणा 31.24, गंगापूर 26.86, भावली 37.10 टक्क्यांवर

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटातून बुधवारी पाऊस गायब झाल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. काल पाणलोटातील बहुतेक भागात ऊन होते. भात लावणीचे काम जोमात सुरू होते. पण अचानक पाऊस बंद झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. गत 24 तासांत केवळ 285 दलघफू पाणी दाखल झाले. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 3541 दलघफू झाला होता. भंडारदरा परिसरात पाऊस कमी असल्याने गत 24 तासांत निळवंडे धरणात 110 दलघफू पाणी आले. त्यामुळे या धरणातील काल सकाळी 1147 दलघफू पाणी साठा झाला होता.

- Advertisement -

गत 24 तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा 14, घाटघर 43, पांजरे 35, रतनवाडी 39. काल भंडारदरा परिसरात पडलेल्या पावसाची नोंद 1 मिमी झाली आहे. मुळा पाणलोटातही पाऊस अचानक ओसरल्याने मुळा नदीतील विसर्ग घटला आहे. परिणामी धरणाकडे येणार आवक मंदावली आहे. मुळा धरणातील पाणीसाठा 7297 दलघफू (28.06 टक्के) झाला होता. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 1873 क्युसेक होता.

घाटमाथ्यावर पावसाच्या सरी

दारणा 31.24, गंगापूर 26.86, भावली 37.10 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर घोटी, इगतपुरी, भावली परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे दारणा, भावली व धरणसमुहातील अन्य धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. काल दिवसभरात दारणा धरण परिसरात कडक ऊन पडले होते, मात्र दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मात्र जोरदार सरी बरसत होत्या. दारणाचा साठा हळूहळू वाढत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणात 246 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. असे एकूण आतापर्यंत 1977 दलघफू म्हणजेच दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

दारणाचा साठा 31.24 टक्के इतका झाला आहे. काल सकाळी 6 वाजेपर्यंत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 20 मिमी, घोटी येथे 11 मिमी पावसाची नोंद आहे. मुकणे धरण 8.61 टक्के भरले आहे. या धरणात 24 तासांत 34 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. भावली धरणात 37.10 टक्के पाणी साठा झाला आहे. भावलीच्या भिंतीजवळ 24 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीत काल सकाळी मागील 24 तासांत 66 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. आता पर्यंत या धरणात अर्धा टीएमसीहुन अधिक पाणी दाखल झाले. दारणा समुहातील वाकी 4.09 टक्के, भाम मध्ये 31.70 टक्के, वालदेवी 8.74 टक्के पाणीसाठा झाला आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात भावलीला 24 मिमी, वाकीला 4 मिमी, मुकणेला 3 मिमी पावसाची नोंद झाली.

गंगापूर धरणाचा साठा 26.86 टक्क्यांवर पोहचला आहे. 5630 क्षमतेच्या या धरणात 1512 दलघफू पाणीसाठा आहे. त्र्यंबकला 3 मिमी, अंबोलीला 5 मिमी, गंगापूरला 4 मिमी, असा पाउस नोंदला गेला. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 33 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. आता पर्यंत अर्धा टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. कश्यपी 5.24 टक्के, गौतमी गोदावरी 16.97 टक्के, कडवा 24.76 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर आळंदी 2.21 टक्क्यांवर स्थिर आहे.
गोदावरी कालव्यांवरील पाऊस असा- देवगाव 9 मिमी, ब्राम्हणगाव 105 , कोपरगाव 39, सोमठाणा 4, कोळगाव 38, सोनेवाडी 31, शिर्डी 50, राहाता 1, रांजणगाव 2, तर चितळी 7 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या