नाशिक | प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या दिवशी शहरातील काही भागात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले तर काही भागात वातावरणात गारवा निर्माण होऊन हलक्या सरी पडल्याने नाशिककरांची धांदल उडाली तर काही भागात विज पुरवठा खंडित झाल्याने दिवाळी साजरी करणाऱ्या नागरिकांच्या आंनदावर पाणी पडले.
सायंकाळी सुमारे पाच वाजता अशोका मार्ग, ममता नगर, द्वारका, टाकळी फाटा, पंचशील नगर, सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसरात काही मिनिटांसाठी तुरळक सरी कोसळल्या. नवीन नाशिक,इंदिरा नगर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पंचवटी परिसरातील मखमलाबाद,आरटीओ परिसरात सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपल्याने नागरिकांच्या आनंदावर पाणी पडले.
नाशिक रोड परिसरातील सुभाष रोड आर्टिलरी सेंटर रोड दत्त मंदिर रोड देवळाली गाव बिटको चौक आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता मात्र त्यानंतर पाऊस थांबला व वीजपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला. राजीव नगर परिसरात देखील ऐन सायंकाळच्या वेळी तब्बल दीड तास वीज पुरवठा खंडित होता. पूजा सुरू असताना अचानक लाईट गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. तरीही नागरिकांनी घरगुती दिवे, मेणबत्त्या आणि मोबाइलच्या प्रकाशात पूजा पार पाडली. शहरातील अनेक भागांमध्ये हवामानातील बदलामुळे दिवाळीचा माहोल वेगळाच अनुभवायला मिळाला.





