राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
पाऊस थांबल्याने विसर्ग कमी झाला. त्यामुळे काल सकाळी नांदूर मधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. वरील धरणातून नांदूर मधमेश्वर बंधार्यात दाखल होणारा विसर्ग कमी झाल्याने काल सकाळी सहा वाजता या बंधार्यातून गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
मात्र या बंधार्यातून गोदावरीचे दोन्ही कालवे तसेच वैजापूर गंगापूर भागात जाणारा जलद कालवा सुरू आहे. पाण्याची आवक वाढली तर गोदावरी पुन्हा विसर्ग होऊ शकतो. एक जूनपासून काल सकाळपर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 42 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गोदावरीच्या उजव्या कालव्याला 300 क्यूसेक, डाव्या कालव्यातून 150 क्यूसेक तर जलद कालव्यातून 403 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
दारणा धरणातून 550 क्यूसेक, वालदेवीतून 107 क्यूसेक, आळंदीतून 37 क्यूसेक, भावलीतून 73 क्यूसेक, भाम मधून 374 क्यूसेक, वाघाड मधून 380, तर तिसगाव मधून 47 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 89.60 टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 75.44 टक्के इतका होता. या वर्षी धरणांची स्थिती चांगली आहे. जायकवाडीची स्थिती चांगली आहे. गोदावरीतून जायकवाडीकडे 42 टीएमसी पाणी रवाना झाले आहे. जायकवाडीचा उपयुक्त साठा 90 टक्क्यांहून अधिक झाला होता. या धरणातून खाली गोदावरीत विसर्गही करण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये काल सकाळी सहा वाजेपर्यंतचे पाणी साठे असे- दारणा 85.51 टक्के, मुकणे 95.30 टक्के, वाकी 87 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, गंगापूर 82.34 टक्के, कश्यपी 100 टक्के, गौतमी गोदावरी 98.93 टक्के, कडवा 89.63 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 88.37 टक्के, पालखेड 69.53 टक्के, करंजवन 84.33 टक्के असे पाणीसाठे आहेत.





