नाशिक | Nashik
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, गेल्या तीन दिवसांपासून सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) चिंब झाला आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील पावसाचा जोर वाढला असून, शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा मिळाला आहे. विशेष करून नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे.
ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर या डोंगराळ भागासह निफाड, सिन्नर, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. मान्सून सक्रिय होऊनही पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र आता, पाऊस चालू झाल्याने खरीप हंगामातील पिकांना (Crop) मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात पाणीच पाणी
नाशिक शहरात (Nashik City) जोरदार पाऊस सुरु असल्याने सीबीएस, मेहेर सिग्नल, कॉलेज रोड, सिडको, सातपूर आणि नाशिक रोडसह आदी भागांत पाणी साचले आहे. हे पाणी साचल्यामुळे वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. या पावसामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांची चांगलीच कसरत होत आहे.
धरण साठ्यात वाढ होणार
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणासह (Gangapur Dam) जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात अशाच प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आज (शनिवार) मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने मैदानी भागासाठी ऑरेंज अलर्ट तर घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह अतिजोरदार पाऊस होऊ शकतो.
नाशिकमध्ये १८.२ मिमी नोंद
नाशिक शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण परिसराला चिंब केले. सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरात १८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे हंगामातील एकूण पाऊस ७८.५ मिमीवर पोहोचला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचले, तर काही प्रमुख मार्गांवर वाहतूक मंदावल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
आजचा हवामानाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यासाठी शनिवार, ४ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, पुढील ७२ तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ६ जुलैनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान अधिकारी एस.डी. सानप यांनी वर्तवला आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे नोंदवला गेला आहे.




