Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराजकारण : तुका म्हणे पुरे आतां| दुर्जनाची संगती रे||

राजकारण : तुका म्हणे पुरे आतां| दुर्जनाची संगती रे||

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक

- Advertisement -

बदनामीच्या वाहत्या गटारगंगेत आपापले स्वार्थ साधण्याची उबळ अनेकांना आली आहे. ‘हनी ट्रॅप’सारख्या घटना पूर्वीही होत असतील; परंतु त्याची वाच्यता कदाचित होत नसावी. आजच्या उघड्यानागड्या व्यवस्थेत सगळेच नजरेत येत असते. ते कसे पाहावे आणि सोडूनि द्यावे हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा प्रश्न!

इगतपुरीच्या निसर्गरम्य स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदाधिकार्‍यांचे तीन दिवसीय शिबिर भरविले खरे, पण त्यात काय झाले यापेक्षा राज ठाकरे यांनी पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमधील ‘हनी ट्रॅप’च्या विषयालाच पाय फुटले अन् या सापळ्यात केवळ नाशिकच नव्हे तर सारा महाराष्ट्र अक्षरश: घुसळून निघाला. या प्रकरणात नाशिक नाहक बदनाम झालेच पण विधिमंडळातही यावर खमंग चर्चा झाल्याने आता गावोगावीच्या अशा ‘हनी ट्रॅप’च्या चौकशीला वेग आला आहे. सुरुवात नाशिकपासून झाल्यामुळे अशा प्रकरणाचे केंद्र अर्थातच नाशिक झाले. दस्तुरखुद्द नाशिकमध्येही बव्हंशी लोकांना हा काय प्रकार आहे, हे कळायला बरेच दिवस गेले.

व्यावसायिक स्पर्धेतून लावण्यात आलेल्या या सापळ्यात बघता बघता असंख्य लोक अडकत गेले खरे, पण हे सारे चर्चेच्या म्हणजेच गॉसिपच्याच पातळीवर राहिले. या ‘हनी ट्रॅप’च्या लिप्स आहेत, व्हिडिओ आहेत, अशाही गावगप्पा सुरू झाल्या. लोक तर जणू त्यांनी स्वत:च त्याचे शूटिंग केले अशा थाटात सांगायला लागले. प्रत्यक्षात अद्याप तरी उघडपणे कोणीही या व्हिडिओ वा लिप्स पाहिल्याचा दावा केलेला नाही. अनेकांनी तर पॉर्न साईटमधील लिप्स काढून त्याच व्हायरल करून त्याच्याशी या ‘हनी ट्रॅप’चा संबंध जोडून चर्चेच्या आगीत तेल टाकले. मुंबई-पुण्यातील अनेकांनीही समाज माध्यमांवर हा विषय आपापल्या बौद्धिक कुवतीनुसार अधिक गंभीर करून टाकला. विधिमंडळात हा विषय उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर भर सभागृहातच पेनड्राईव्ह दाखवून या प्रकरणातील गांभीर्य वाढविले.

सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात, ‘ना हनी आहे ना ट्रॅप’ असे स्पष्ट करून केवळ एकच प्रकरण झाले व तेदेखील सामोपचाराने मिटल्याचे सांगून विषय संपविला. अर्थात लैंगिक विषय असल्याने असले विषय आंबटशौकिनांना चघळायला आवडतातच. परिणामी व्यक्तीनिहाय अशा प्रकरणांच्या सुरस अन् रंगेल कथा बाहेर पडू लागल्या नव्हे दररोज नवनव्या भानगडी पुढे येत आहेत. या प्रकरणातील ज्या हॉटेलचे नाव घेतले जाते ते काँग्रेसच्या पदाधिकार्‍याचे असल्याचे सांगत मुख्यंत्र्यांनी नाना पटोलेंना गप्पगार केले. अर्थात पटोले गप्प झाले असले तरी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता हे सांगितले त्यामुळे ज्यांची चर्चा गेले काही दिवस नाशिकमध्ये होत होती, त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले आणि अनेकांना धक्का बसला. हे असे कसे झाले, विश्वासच बसत नाही, हा या लायकीचा असेल असे वाटले नव्हते थाटाच्या प्रतिक्रिया उमटल्या.

ठाणे, पुणे व नाशिक येथील विषय खरे तर वेगवेगळे होते. मात्र नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’ची चर्चा होताना महसूल, पोलीस, जीएसटी या सरकारी खात्यातील ७२ अधिकारी त्यात अडकल्याचे बोलले गेल्याने हे सारे नाशिकमध्येच घडल्याचे समजले गेले. प्रत्यक्षात जे ७२ नव्हे पण ७० अधिकारी अडकले तो विषय मुंबई व ठाणे परिसरातील असून त्यासंदर्भात एका महिलेने फसविल्याच्या तक्रारी पोलिसांतही दाखल आहेत. नाशिकमध्ये जे काही घडले ते एका अतिरिक्त जिल्हाधिकार्‍याशी संबंधित असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले असल्याने त्यावर विश्वास ठेवावा लागतो. सदर अधिकारी व एका राजकीय पक्षाशी संबंधित महिलेच्या विवाहबाह्य संबंधात बाधा आल्याने त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसात अर्ज दिले. नंतर त्यात तडजोड झाल्याने ते अर्जही मागे घेतले गेले. हा विषय सहा महिन्यांपूर्वीचा असल्याचे आता सांगितले जात आहे.

आता यात पुढचा संबंध आला तो त्या अधिकारी व महिलेने ज्या हॉटेलचा वापर केला त्याचा व त्याच्या मालकाचा. ही बडी आसामी असल्याने साहजिकच त्याचा गवगवा होऊ लागला. संबंधित आसामी ही बड्या राजकीय घराण्याशी संबंधित, काँग्रेसची पदाधिकारी आणि शहरातील असंख्य उच्चपदस्थांच्या गोतावळ्यात केंद्रस्थानी असलेली! असंख्य राजकीय नेते, मंत्री एवढेच नव्हे तर अगदी राज ठाकरेंचेही कधी कधी वास्तव्य याच आसामीच्या शहरातील हॉटेलमध्ये राहिलेले आहे. जेथे ‘तो’ प्रकार घडला ती जागा शहराबाहेरच्या दुसर्‍या हॉटेल कम रिसॉर्टमध्ये आहे. परंतु शहरातील जे हॉटेल गेली काही वर्षे राजकीय अड्डा बनून गेले होते, त्याचीच चर्चा सुरू झाली. तेथे चोवीस तास चालणारे कॉफी शॉप असल्याने रात्रीच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही विरंगुळा म्हणून ते गरजेचे झाले. मंत्रीदेखील तेथे थांबत असल्याने सारा शासकीय सरंजामही तेथे असणे नेहमीचे झाले. या सार्‍या प्रभावातून पुढे अनेक नको त्या गोष्टी घडत गेल्याचे आता सांगितले जात आहे.

प्रत्यक्षात यासंदर्भातील जी काही चर्चा होत आहे, त्याचा काहीही पुरावा कोणत्याच अर्थाने कोणाच्याही हाती नाही. परंतु संबंधित बड्या आसामीने छुप्या कॅमेर्‍याच्या मदतीने अनेकांवर हा ‘हनी ट्रॅप’ लावल्याची घटना मात्र लोक चवीने पसरवत आहेत. अगदी किती कोटीचे हे कॅमेरे आहेत इथपर्यंत लोक ‘ठोकून देता ऐसा जे’ स्टाईलने सांगत सुटले आहेत. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली व त्यांना खरोखरच काही हाती लागले तरच विश्वास ठेवता येऊ शकेल. मात्र, हे प्रकरण एकदम असे उजेडात कसे आले, थेट राज ठाकरेंनी या प्रकरणाचा अनौपचारिक गप्पांमध्ये भांडाफोड का केला, या मागे नेमके कोण असावे, काही माध्यमांना कथित प्रकरणांचे खाद्य कोणी पुरविले? याचा मात्र काही जणांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही कड्या जुळत आल्या त्यादेखील अर्थात तर्काधारित आहेत. ते तसेच घडले असेल यालाही काही तसा अधिकृत आधार नाही.

मध्यंतरी नाशिकच्या अनेक बड्या बिल्डरांवर पोलिसांनी आयुक्तालयाची जमीन फसवणुकीद्वारे लाटल्याचा आरोप करून गुन्हे दाखल केले. तेव्हाही नाशिक हादरले होते. हे जुने प्रकरण अचानक कसे पुढे आले याचे तेव्हाही अनेकांना आश्चर्य वाटले. तर या प्रकरणामागे हीच ती बडी आसामी असल्याचा निष्कर्ष काढला गेला. याबरोबरच एका मंत्र्याच्या नातेवाईकाशी संबंधित व इतर काही भानगडीही लगोलग पुढे आल्या. या आसामीचा गोतावळ्यातीलच मित्रमंडळींना त्रास होऊ लागल्यानंतर अखेर कडेलोट झालेल्या या संबंधितांनी आपापल्या हितसंबंधाचा वापर करीत हा वेगळ्या अर्थाने ‘ट्रॅप’ लावला. या सापळ्यात मात्र संपूर्ण नाशिकच बदनामीच्या व्यथेने होरपळून निघते आहे.

सोंग संपाधी वरीवरी |
करूं नये तेंचि करी |मार्ग चुकोन भरे भरीं |
तो येक पढतमूर्ख ॥

सर्व काही कळत असूनही जो मूर्खपणा करतो अशा माणसाला समर्थ रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात. जो वर वर खोटे सोंग धारण करतो, नाटकी आविर्भाव आणतो आणि नेमके जे करू नये तेच करीत राहतो, सरळ मार्ग अथवा योग्य मार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात राहतो (व स्वत:चे हसे करून घेतो) तो एक पढतमूर्खच होय! सध्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात ज्यांची नावे येत आहेत, त्यांना समर्थांचे हे पढतमूर्खाचे लक्षण नेमकेपणाने फिट बसते. कारण एकाच आसामीचे नाव पुढे येत असले तरी सारी लाजलज्जा सोडून अशा प्रकरणांमध्ये सहभाग घेणे, स्त्रीत्वाचा असा वापर करणे किंवा करू देणे आणि संकटात सापडलेल्यांना सोडवण्याच्या बहाण्याने आपापले स्वार्थ साधणे या हेतूने कार्यरत असलेल्या अनेकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचेही पुढे येत आहे. हे असे फिसर सगळीकडेच असतात. पोलीस व न्यायालयात मध्यस्थी की दलाली करणे, त्यासाठी नको त्या आयुधांचा वापर करणे हे तर अलीकडे जणू सार्वभौम मार्ग झाले आहेत. असे उद्योग करणारेही सर्वत्र खंडीभर आहेत. माध्यमांतीलही अनेक महाभाग अशा टोळ्यांमध्ये मोठ्या हिकमतीने आपापला तोल सांभाळत कार्यरत असतात. सगळेच भीषण! तीन-साडेतीन शतकांपूर्वी अशा क्षणिक स्वार्थासाठी हपापलेल्या लोकांची लक्षणे सांगताना समर्थ पुढे असेही म्हणतात की,

तुक तोडून बोले |
मार्ग सांडून चाले |
कुकर्मी मित्र केले |
तो येक मूर्ख ॥ ४७ ॥

आपला मार्ग सोडून मित्रमंडळींबरोबर कुकर्मात सहभागी होणारे सारेच मूर्ख असतात असे तेव्हा समर्थ म्हणाले खरे, पण आज हे असे करणारे समाजात ताठ मानेने वावरतात हा काळाचा महिमा आहे.

‘हनी ट्रॅप’ प्रकरणामुळे सगळ्या राज्याचाच नाशिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून ठिकठिकाणचे लोक ‘काय चालले आहे नाशकात.’ अशी पृच्छा करू लागले आहेत. हॉटेल व्यावसायिक तर कमालीचे घाबरले आहेत, अनेकांनी नियोजित बुकिंग रद्द करणे सुरू केल्याने हा सापळा आता आणखी किती जणांचे कसकसे नुकसान करू शकतो, हे पुढे येत आहे. प्रसिद्ध करता येईल असा कोणताही पुरावा नसताना, कोणताही अगदी परिस्थितीजन्य पुरावाही नसताना हे प्रकरण आज प्रत्येकाच्या तोंडी झाले आहे. कालानुरूप सगळेच बदलले असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा परिणाम समजत नाही. परंतु या प्रकरणात काहीही हाताशी नसताना एका महाभयानक प्रकरणाचा दुर्गंध सर्वत्र पसरला आहे.

राजकारणी मंडळी त्यांच्या पद्धतीने या घटनेचे राजकारण करीत आहेत. शहरातील काही उच्चपदस्थ, अधिकारी, उद्योजक आदी आपापली व्यावसायिक खुन्नसही यानिमित्ताने काढू पाहत आहेत. पुन्हा हे सगळे कळते-समजते या पातळीवर असल्याने गाजराच्या पुंगीसारखे आहे. वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली. तसेच या प्रकरणात उद्या खरोखरच काही हाती लागले नाही तर आपण तर काय कानावर आले ते सांगितले, असेही म्हणता येते आणि काही सुराग मिळालाच तर मी म्हणत होतो ना असे तोंड वेंगाडून सांगायलाही तयार! नाशिकमधील अनेक संवेदनशील लोकांनी या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यापासून काय चालले आहे आपल्या नाशकात अशा प्रश्नार्थक चर्चेच्या माध्यमातून खंत व्यक्त करणे चालू केले आहे. वाढती गुन्हेगारी, गुन्ह्यांमधील अल्पवयीनांचा वाढता सहभाग, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रकार आणि आता अशा कुकर्मातून खंडण्या गोळा करण्याचा सुरू झालेला उद्योग हे एका भयानक मार्गाकडे घेऊन जाणारे आहे. हे थांबवायला हवे.

दुर्दैवाने ज्यांच्याकडे यासाठी आशेने पाहावे अशीच मंडळी कोणत्या ना कोणत्या प्रकारात हात पोळून बसलेले असतात. अनेकांना तर अशा भानगडींपासून चार हात दूर राहणेच योग्य वाटते. राजकारणी लोक त्यांच्या सोयीनुसार अशी प्रकरणे हाताळतात. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्षातही सध्या सुरू असलेले संघर्षाचे चक्र. काही जणांनी लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याची चर्चाही याचनिमित्ताने सुरू करून दिली गेली आहे. थोडयात काय तर प्रत्येकालाच आता या बदनामीच्या वाहत्या गटारगंगेत आपापले स्वार्थ साधण्याची उबळ आली आहे. अशाप्रकारच्या घटना पूर्वीही कदाचित होतही असतील; परंतु त्याची वाच्यता कदाचित होत नसावी. आजच्या उघड्यानागड्या व्यवस्थेत सगळेच नजरेत येत असते. ते कसे पाहावे आणि सोडूनि द्यावे हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा प्रश्न.

जाता जाता संत तुकारामांचा हा सल्ला मात्र या सर्वांनीच पाळायला हवा.
होणार होऊनि गेलें |
मिथ्या आतां खंती रे ॥२॥
तुका म्हणे पुरे आतां |
दुर्जनाची संगती रे ॥३॥

ताज्या बातम्या

Shrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील खंडाळा (Khandala) शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे (Railway) मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह (Youth and Young Girl Dead Body) रेल्वेखाली चिरडलेल्या...