Tuesday, September 1, 2026
Homeराजकीयमनसेच्या वर्धापनदिनाआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा; पदाधिकाऱ्यांना आवाहन करत दिला कानमंत्र

मनसेच्या वर्धापनदिनाआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा; पदाधिकाऱ्यांना आवाहन करत दिला कानमंत्र

मुंबई । Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी कंबर कसली असून १० मार्च २०२६ पासून राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेची घोषणा केली आहे.

या मोहिमेचा प्रारंभ राज ठाकरे स्वतः उद्या, ९ मार्च रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करणार आहेत. या संदर्भात त्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना आक्रमक आवाहन केले आहे.

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय?

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,

आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.

आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.

सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !

प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा.
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच !

स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !

धन्यवाद !

आपला नम्र

राज ठाकरे

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तारावर भर; २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबिर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)संघटनात्मक विस्तारासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या पक्षाकडे लोकसभेतील १ खासदार आणि विधानसभेतील ४१ आमदार...