अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली. त्यांचे ते वक्तव्य म्हणजे मतदारांचा अपमान आहे. व्यवस्थेवर संशय निर्माण करणे हा संगमनेरच्या मतदारांवर अविश्वास असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे यांनी दिली.
नगरमध्ये शनिवारी माध्यमांशी बोलताना मंत्री विखेंनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात पराभूत कसे होतात, असा सवाल विचारून मते गहाळ झाल्याचा दावा करीत काही शंका व्यक्त केल्या होत्या. यावर मंत्री विखे यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंवर टीका केली. जनतेने दिलेला तो जनादेश आहे. त्याचा अनादर करणे योग्य नाही. निवडणूक घेणारी स्वतंत्र व्यवस्था असून अशा व्यवस्थेवर संशय घेणे म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे नवे अप्पर तहसील कार्यालय करण्यावरून वाद सुरू आहेत. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे म्हणाले, तेथील महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी मला यासंदर्भात माहिती दिली आहे. संगमनेर तालुक्याचे कोणतेही विभाजन होणार नाही व तसा कोणताही अर्थ नव्या प्रस्तावातून नाही. घोडेगाव, राजूर व आश्वी अशा तीन ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयांचे प्रस्ताव आहेत. महसूल मंडळांच्या जुन्या व्यवस्थेनुसार ही प्रस्तावित रचना आहे. मात्र, जनतेची गैरसोय होत असेल तर महसूल मंडळाची पुर्नरचना करण्यात येईल. प्रत्येक गावाच्या सोईनुसार नव्याने महसूल मंडळाची रचना करण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. महसूल यंत्रणेच्या कामाच्या विभाजनासाठी हे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
हरेगावला परदेशी गुंतवणूक
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे एका परदेशी कंपनीने दोन हजार एकर जागा मागितली आहे व तेथे ती कंपनी 17 हजार कोटींची परकीय गुंतवणूक करून त्यांचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रस्तावास शासनाचा सकारात्मक प्रतिसाद असून हरेगाव येथील शेती महामंडळाची जमीन या प्रकल्पास देण्याचा विचार आहे.
स्थानिक स्वराज्यासाठी तयारी सुरू
स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी राज्य सरकार म्हणून आवश्यक तयारी सुरू आहे. ओबीसीसह अन्य जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर माहिती संकलीत करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे जिल्ह्याच्या विकास काम निधीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव नाही. जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम सुरू आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांबाबतच्या तक्रारींवर आपण भाष्य करणार नाही, त्या खात्याचे मंत्री त्यावर बोलण्यास सक्षम आहेत, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणे काढावीच लागतील
अतिक्रमणे काढणे बंधनकारक आहेत. त्यामुळे जिल्हाभरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मात्र, यातून कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही. अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून निर्णय घेऊ, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, प्रस्तावित एमआयडीसीसाठी नगरच्या विळद घाटातील जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यास काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या हस्तांतरास स्थगिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.