मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली.
घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने राज ठाकरेंकडे लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. वरती दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाट्टेल ते करू, असे जैन समाजाला वाटते का? व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा. तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही समजून सांगा, असेही राज ठाकरेंनी जैन समाजातील पदाधिकाऱ्यांना बजावले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका तुमची डोकी भडकवली जात आहे, आमची डोकी भडकली तर केवढे होईल. तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात… विनाकारण वाद निर्माण करत आहात. इतकी वर्ष लोक राहत आहे. इतकी गुजराती लोक राहत आहेतस पूर्वीपासून राहत आहेत कधी भांडण नाही, वाद नाही. हे १० ते १२ वर्षांतच कसे सुरू झाले? वरती दोन गुजराती बसलेत म्हणून आम्ही वाट्टेल ते करू, असे जैन समाजाला वाटते का? असे थोडी होते,” असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
“पांढरे पट्टे मारायला ट्रॅफिक विभागात आहात का? कोणत्याही सोसायटीत कोणत्याही धर्मानं अशा गोष्टी करायला नकोत. व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा. धर्माच्या ठिकाणी धर्माचं काम करा. त्याला कोणीही अडवलं नाही. तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही समजून सांगा,” असेही राज ठाकरेंनी जैन समाजातील प्रतिनिधींना बजावून सांगितलं.




