Sunday, May 17, 2026
Homeदेश विदेशRajdhani Express fire : धावत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग, प्रवाशांची डब्यात...

Rajdhani Express fire : धावत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग, प्रवाशांची डब्यात एकच धावाधाव

दिल्ली । Delhi

वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्र. १२४३१) रविवारी पहाटे भीषण आग लागली. कोटा रेल्वे विभागांतर्गत रतलाम जिल्ह्यातील अलोट स्टेशनजवळ, लुनी रिछा आणि विक्रमगड अलोट स्थानकांच्या दरम्यान हा थरार घडला.

- Advertisement -

रविवारी सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास, जेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा गाडीच्या ‘बी-१’ (B1) या वातानुकूलित (AC) डब्याला अचानक आग लागली. या डब्यातून तब्बल ६८ प्रवासी प्रवास करत होते. मात्र, रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या अचाट तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, एक मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी एक्सप्रेस पूर्ण वेगात धावत असताना गाडीच्या गार्डला ‘बी-१’ डब्यातून अचानक धूर निघत असल्याचे दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गार्डने तात्काळ वायरलेसवरून इंजिन चालकाला (लोको पायलट) सतर्क केले आणि गाडी जागीच थांबवण्यात आली. डब्यात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट आणि पळापळ निर्माण झाली होती.

गाडी थांबताच रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानांनी विलंब न लावता तातडीने मदतकार्य सुरू केले. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत अवघ्या १५ मिनिटांत डब्यातील सर्व ६८ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घेत आग लागलेला डबा मुख्य गाडीपासून वेगळा केला आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी ट्रेनचा वीजपुरवठा खंडित केला. अग्निशमन दल आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत रेल्वे डब्याचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच कोटा रेल्वे विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे; मात्र आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, या मुख्य मार्गावर झालेल्या अपघातामुळे देशातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या अनेक तासांपासून या मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या जागच्या जागी रोखून धरण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर मार्ग मोकळा करण्याचे काम करत असून, लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, असे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ट्रॅफिक पार्कला अखेर ‘ब्रेक’! अपमानास्पद वागणुकीमुळे माघार –...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात गेल्या १३ वर्षांपासून रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जनजागृतीचे काम करणारा व नाशिकच्या वैभवात भर घालणारा ट्रॅफिक एज्युकेशन पार्क (Traffic...