Tuesday, July 28, 2026
HomeराजकीयRajen Patil : "मुलाकडून चुकीचे शब्द, मी अजितदादांची…"; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता...

Rajen Patil : “मुलाकडून चुकीचे शब्द, मी अजितदादांची…”; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!

सोलापूर । Solapur

अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बाळराजे पाटील ऊर्फ विक्रांत पाटील यांनी थेट अजित पवारांना एकेरी उल्लेख करत ‘ओपन चॅलेंज’ दिले होते. मात्र, या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसातच पाटील कुटुंबाने नरमाईची भूमिका घेतली आहे. बाळराजे पाटील यांचे वडील आणि माजी आमदार राजन पाटील यांनी आज (१९ नोव्हेंबर २०२५) पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाच्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. तसेच, अजित पवारांनी आपल्या मुलाची चूक माफ करून त्याला ‘पदरात’ घ्यावे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनगमध्ये बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून थेट आव्हान दिले होते. “अजित पवार… सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद नाही करायचा,” असे बाळराजे यांनी म्हटले होते. राजन पाटील यांचे पुत्र असलेल्या बाळराजे पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या आणि मोठी चर्चा सुरू झाली होती.

आजच्या पत्रकार परिषदेत राजन पाटील यांनी अत्यंत नम्रपणे आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “अनगमध्ये आजपर्यंत कधीही निवडणूक झालेली नाही. मात्र, यंदा पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने तरुण मुलांमध्ये मोठा उत्साह होता. याच उत्साहातून आणि भावनेच्या भरात आमच्या मुलाने तिथे जे वक्तव्य केले, मी त्याचे समर्थन करू शकत नाही.” ते पुढे म्हणाले, “माझा मुलगा राजकारणाच्या दृष्टीने अजून लहान आहे. त्यांच्या तोंडून नकळत अशा प्रकारचे वक्तव्य गेले आहे. त्यामुळे वडील म्हणून मी आणि पाटील परिवाराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि क्षमा मागतो.”

अजित पवारांसोबत झालेल्या या वादावर स्पष्टीकरण देताना राजन पाटील यांनी पवार कुटुंबाशी असलेले आपले जुने आणि घट्ट संबंध अधोरेखित केले. “मी आज जरी मोठे पवारसाहेब (शरद पवार) आणि अजितदादांपासून बाजूला गेलो असलो, तरी या गोष्टीला अजितदादा कारणीभूत आहेत, असे मी मानणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मी बाजूला जाण्याला अनेक कारणे आहेत. तरीसुद्धा, मी कायमच त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. आतापर्यंत जे राजकीय वैभव उभे करण्यात आले आहे, त्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राजन पाटील यांनी पुन्हा एकदा बाळराजे यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. “माझ्या मुलाच्या तोंडातून उत्साहात आणि भावनेच्या भरात जे अपशब्द गेले आहेत, ते यत्किंचितही जायला नको होते. त्याबद्दल मी व्यक्तीश: अजितदादांचे आणि पवार परिवाराची अंतरकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. या संपूर्ण प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना राग येणे स्वाभाविक आहे, अशी कबुलीही राजन पाटील यांनी दिली. मात्र, त्यांनी अजित पवारांना भावनिक साद घातली. “आपला मुलगा चुकला तर आपण त्याला पदरात घेतो, त्याप्रमाणे अजितदादांनी पार्थ आणि जयप्रमाणे (अजित पवार यांचे पुत्र) माझ्या मुलाची ही चूक पदरात घ्यावी,” अशी विनंती त्यांनी केली.

“हा विषय आता इथेच थांबवावा,” असे आवाहनही राजन पाटील यांनी केले आहे. पाटील कुटुंबाने घेतलेल्या या माघारीमुळे अनगरच्या स्थानिक राजकारणासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार आता यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सरकारच्यावतीने गरजू व पात्र रेशनकार्डधारकांनाच सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशनकार्डाची छाननी सुरू आहे. यामध्ये अपात्र, बनावट,...