Monday, August 24, 2026
Homeराजकीयदेशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; PM मोदींना...

देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप; PM मोदींना लिहिले पत्र

मुंबई । Mumbai

ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांच्या स्वयंपाकघरातील गोडवा कडू झाला आहे. बाजारात साखरेचे दर गगनाला भिडले असून या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. मात्र, दुसरीकडे या गगनाला भिडलेल्या दरवाढीचा नटभरही फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी वर्गही कमालीचा संतप्त झाला आहे. देशात साखरेचा कोणताही वास्तविक तुटवडा नसताना केवळ मूठभर लोकांसाठी आणि नफेखोरीसाठी हा कृत्रिम घोडेबाजार सुरू असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी साखरेच्या आकडेवारीवरून सरकारला धारेवर धरले. देशात दरमहा २२ लाख टन साखरेचा कोटा दिला जातो. परंतु, सरकारने दिलेल्या ४५ ते ४८ लाख टन साखरेचा कोणताही स्पष्ट हिशोब लागत नाही, असा दावा त्यांनी केला. “साखरेची रिकव्हरी चोरून आणि ती साठवून ठेवून चढ्या दराने विकण्याचे कारस्थान रचले गेले आहे. राज्यातील काही साखर कारखान्यांनी टेंडर काढूनही प्रत्यक्ष साखर विकली नाही. यावरून भाव वाढवायचे हे आधीच ठरलेले होते,” असा थेट आरोप त्यांनी केला.

तसेच, साखरेची खरोखरच टंचाई असती तर बाजारात साखर मिळणे बंद झाले असते, परंतु साखर मुबलक उपलब्ध आहे, फक्त ती महाग झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापारी आणि कारखानदारांच्या गोदामांची झाडाझडती घ्यावी. कागदावरील स्टॉक आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यांची तपासणी करून बिनहिसाबी साखर जप्त करण्याची मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणावर टीका करताना शेट्टी म्हणाले, “ही आयात केलेली साखर ऑक्टोबरमध्ये भारतात येईल, ज्यावेळी देशातील साखर कारखाने सुरू होणार आहेत. यामुळे दरांमध्ये मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल.” याशिवाय, निर्यातीवर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये साखर कशी जाते? असा सवाल करत त्यांनी गृहखात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “काहींचे ऑफिस दुबईत असून मूठभर लोक ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी ४५ हजार कोटींची गुंतवणूक करायला लावून आता धोरण बदलले जाते, याची जबाबदारी कुणाची?” असा सवालही त्यांनी विचारला.

केवळ साखरेचा प्रश्नच नव्हे, तर राज्याच्या कृषी व आरोग्य क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवरही राजू शेट्टी यांनी रोखठोक भूमिका मांडली. प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्गा’मुळे २६ हजार एकर जमीन संपादित होणार असून त्यातील १९ हजार एकर जमीन सुपीक बागायती आहे. देवाचे नाव घेऊन सरकार शेतकरी उद्ध्वस्त करत असून, संत सावता माळी यांच्या स्मारकावरून रस्ता नेण्याला त्यांनी कडाडून विरोध केला.

यासोबतच, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचे समर्थन करत, सूर्यफुलाच्या तेलात पामतेलाची भेसळ करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने तात्काळ एफआरपी (FRP) द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, असा आक्रमक इशारा शेट्टी यांनी शेवटी दिला.

ताज्या बातम्या

Nashik News : अंगावर भस्म, हातात कवटी अन् महादेवाचा जयघोष; त्र्यंबकेश्वरच्या...

0
पंचवटी |प्रतिनिधी | Panchvati बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प हाती घेत संगमनेर येथे वास्तव्यास असलेले योगी भूतनाथ महाराज महादेवाच्या भक्तीची अनोखी वाटचाल करीत आहेत. मध्य प्रदेशातील...