मुंबई । Mumbai
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतरही उमेदवारीचा प्रश्न सुटलेला नसल्याचे समजते.
या महत्त्वाच्या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेट घेतली असली, तरी या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या अनिश्चिततेमुळे आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारी (५ मार्च) संपत आहे. वेळेची कमतरता लक्षात घेता महाविकास आघाडीत भेटीगाठींचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या तिन्ही पक्षांनी सातव्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. संख्याबळाच्या गणितामुळे या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचे निश्चित केले आहे. मात्र, सध्याच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जर शरद पवार यांनी सातवी जागा लढवली, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. याच संदर्भात सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली होती.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये बिहारमधून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, आसाममधून जोगेन मोहन आणि तेरस गोवाला यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिली आहे.
ओडिशामधून मनमोहन समल आणि सुजीतकुमार, तर हरियाणातून माजी खासदार संजय भाटिया यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. बिहारमधून भाजपचे सरचिटणीस शिवेशकुमार यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्याप्रमाणेच आता नितीन नवीन यांनाही अध्यक्षपद भूषवताना राज्यसभेवर पाठवले जात आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आपला कोणता उमेदवार जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




