Monday, August 17, 2026
HomeनगरKopargav : रस्त्यांच्या दूरवस्थेवरून एकाच मंचावर दोन युवा नेत्यांमध्ये ‘वार-पलटवार’

Kopargav : रस्त्यांच्या दूरवस्थेवरून एकाच मंचावर दोन युवा नेत्यांमध्ये ‘वार-पलटवार’

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, विशेषत: झगडेफाटा ते तळेगाव दिघे रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेचा मुद्दा रांजणगाव देशमुख येथे आयोजित उप बाजार समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमात चांगलाच गाजला. सत्ताधारी पक्षातील दोन युवा नेत्यांमध्ये याच मुद्द्यावरून व्यासपीठावरच शाब्दिक वार-पलटवार झाल्याने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. औताडे यांनी रस्त्याचे काम कोणीही केले तरी फ्लेक्स मात्र आमदारांचेच लागणार, असे मार्मिक विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर, युवा नेते विवेक कोल्हे यांनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत आमदार आशुतोष काळे यांच्यावर निशाणा साधला. रस्त्याच्या अवस्थेमुळे कार्यक्रमाला येण्यास थोडासा उशीर झाला. आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलो तरी आमदार सत्तेत आहेत. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावरच टीका करणार आणि रस्त्याच्या कामाची मागणी करणार असे ते म्हणाले. त्यांनी पुढे, तुमच्या प्रयत्नानेही प्रश्न सुटत नसेल, तर तुमच्या नेतृत्वात येथे आंदोलन घ्या, आम्ही सहभागी होतो, असे थेट आव्हान दिले.

व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आशुतोष काळे यांनीही रस्त्याच्या मुद्द्यावर उत्तर दिले. रस्त्याचं काम मीच करणार, तुम्ही चिंता करू नका. मी कामाचा माणूस आहे. मी भाषण-बिषण मानत नाही, मी कामात लक्ष देत असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले. लवकरच रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळेल, असे आश्वासन देत फ्लेक्स तर लागणारच असे म्हणत त्यांनी औताडे यांच्या विधानाचा धागा पकडला.

सर्व आरोप-प्रत्यारोप शांतपणे ऐकत असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दोन्ही युवा नेत्यांना वडिलकीचा सल्ला दिला. कोणावर टीका करण्यापेक्षा विकासासाठी एकत्र राहा. मागच्या विधानसभेला जसे एकत्र राहिलो, तसेच पुढील पाच वर्ष राहा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या सल्ल्याने वादावर पडदा पडला. बाजार समितीच्या उपआवाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम असला तरी, झगडेफाटा ते तळेगाव दिघे रस्त्यांची चर्चा सर्वाधिक झाली आणि युवा नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली.

ताज्या बातम्या

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

0
दिल्ली। Delhi पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध 'अशोक धाम' मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक...