Sunday, June 21, 2026
Homeक्राईमRahuri : काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेला रेशनिंगचा 238 गोण्या गहू-तांदूळ जप्त

Rahuri : काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेला रेशनिंगचा 238 गोण्या गहू-तांदूळ जप्त

दोन वाहनांसह आरोपी ताब्यात || एलसीबीची कारवाई

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सोनगाव-सात्रळ शिवारात एकूण 238 गोण्या शासकीय रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवणार्‍या एका तरुणाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. तब्बल 12 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 12,850 किलो शासकीय धान्य आणि दोन वाहने जप्त करण्यात आली असून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

19 जून रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोनगाव सात्रळ येथील यासिर सादिक तांबोळी हा रेशनिंगचा गहू व तांदूळ विक्रीसाठी साई बालाजी फर्निचरजवळील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवत आहे. माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड आणि रमीजराजा अतार यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले. पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता गोडाऊनमध्ये एक व्यक्ती आढळून आली. चौकशीत त्याने आपले नाव यासिर सादिक तांबोळी (वय 26) रा. सोनगाव सात्रळ, ता. राहुरी असे सांगितले.

गोडाऊनची पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात गहू व तांदळाच्या गोण्या तसेच दोन वाहने आढळून आली. धान्याबाबत विचारणा केली असता आरोपीने परिसरातील रेशनिंग दुकानांतून हे धान्य काळ्या बाजारातून खरेदी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी 6,990 किलो वजनाच्या गव्हाच्या 121 गोण्या (किंमत 2 लाख 9 हजार 700 रुपये), 5,860 किलो वजनाच्या तांदळाच्या 117 गोण्या (किंमत 2 लाख 93 हजार रुपये) तसेच 7 लाख रुपये किमतीची दोन वाहने असा एकूण 12 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गु.र.न. 713/2026 अन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जूनअखेर नगर, नाशिकमध्ये मान्सून बरसण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मंगळवार 23 जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असून या ठिकाणी सध्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. वेंगुर्ला, देवगड हर्णाई...