नवी दिल्ली | New Delhi
भाजपकडून (BJP) मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा पुढे येणार यावर चर्चा सुरू असतानाच अखेर काल (बुधवारी) भाजपच्या आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर आज रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची (CM Oath) तर परवेश शर्मा (Parvesh Sharma) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुप्ता यांच्या रूपाने दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. थोड्याच वेळात हा शपथविधी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणार आहे.
रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश?
राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीनंतर भाजपचे मंत्रिमंडळाची यादी (List of Cabinet) समोर आली आहे. या नव्या मंत्रिमंडळात प्रवेश वर्मा (जाट), मनजिंदर सिरसा (शिख), आशीष सूद (पंजाबी) आणि रविंदर इंद्रज सिंह (दलित) या नेत्यांचा समावेश आहे. पूर्वांचलचे प्रतिनिधित्व करणारे पंकज सिंह आणि कपिल मिश्रा यांचाही समावेश आहे. रेखा गुप्ता यांच्यासोबत सहा मंत्री गुरुवारी रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास
रेखा गुप्ता या संघविचारक आणि प्रचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजपत कार्यरत आहेत. सन १९९४-९५ ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या असून १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्ष, सन २००३-२००४ ला भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव, २००४-२००६ ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव, त्यानंतर एप्रिल २००७ ला उत्तरी पीतमपुरा वॉर्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. तर २००७-२००९ महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्ष झाल्या. मार्च २०१० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली, सध्या रेखा गुप्ता या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. शालिमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला.
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामलीला मैदानावर भव्य असे आयोजन कऱण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्री मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, जेपी नड्डा यांचा समावेश असेल. त्याशिवाय देशभरातलील भाजपचे २० मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलेय. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय शेतकरी, कॅब चालाकांनाही सोहळ्याच आमंत्रण देण्यात आले आहे.