Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : धार्मिक कट्टरतेचा शैक्षणिक क्षेत्रालाही विळखा

पडसाद : धार्मिक कट्टरतेचा शैक्षणिक क्षेत्रालाही विळखा

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना|
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्तां हमारा ॥

सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा, या प्रसिद्ध शायर मोहम्मद इक्बाल यांनी तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या देशभक्तीपर गीताची आजही तेवढीच असोशी वाटते. हे खरे असले तरी प्रत्यक्षात उपरोल्लेखित कडव्यांमधील ऐक्याची भावना मात्र आज झपाट्याने लोप पावत चालली आहे. मजहब म्हणजेच धर्म हा आपल्याला वैरभाव शिकवित नाही, असे कवीला म्हणायचे आहे. आपण सगळेच हिंदी आहोत आणि आपला देश हा हिंदुस्थान आहे हे शायर इक्बाल याचे म्हणणे. आज मात्र काही शक्ती धर्माच्याच नावावर वैरभावना पेटवित असल्याचे दुर्दैवी प्रसंग वारंवार घडतात.

मालेगावमध्ये पालिका कार्यालयातच नमाज पठणाची घटना घडल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रकार घडला. त्यातून निर्माण झालेला तणाव निवळत नाही तोच आता नाशिकमधील एका खासगी विद्यापीठात असाच प्रकार घडला. अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही मुस्लीम तरुणांनी होस्टेलच्या खोलीत नमाज पठण केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. लागलीच दोन-चारशे जणांचा जमाव महाविद्यालयात पोहोचला. त्यांनी तेथील ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा म्हटली. प्राचार्यांनी सामंजस्याने हा विषय हाताळला. मात्र, जे झाले ते योग्य नाही. विशेषत: शैक्षणिक संस्था या जाती-धर्माचे अड्डे बनू नयेत, ही सर्वसाधारण अपेक्षा. मालेगाव पालिकेत जे घडले तेदेखील अनावश्यक होते आणि शैक्षणिक संस्थेत जे झाले ते देखील.

पालिकेत राजकारण चालत असल्याने त्याला तसा रंग येणे स्वाभाविक होते. त्याची शिक्षा तेथील अधिकारी, कर्मचार्‍यांनी भोगली. विशेष म्हणजे ज्यांनी नमाज पठण केले ते खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ, पण कार्यालयात केल्याने ते केवळ दखलपात्रच नव्हे तर कारवाईसही पात्र ठरते.
मालेगावसारख्या संवेदनशील शहराने यापूर्वी खूप काही सोसले आहे. हल्ली किरीट सोमय्यांच्या हट्टाखातर नव्याने काही तेथे घडू पाहत आहे. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचे छायाचित्र लावले. त्यावरून बरीच उलथापालथ झाली. ज्येष्ठ पुरोगामी नेते निहाल अहमद यांच्या कन्या असलेल्या शान-ए-हिंद यांना असा अगोचरपणा करण्याची खरे तर काहीच गरज नव्हती. परंतु धार्मिक तुष्टीकरणाच्या अपरिहार्यतेमुळे त्या असे करू धजल्या असतील.

काही वर्षांपूर्वी त्यांचे पिताश्री निहालभाई यांच्याकडूनही गणपती आरासबाबत आततायीपणा झाला आणि त्यांच्या पुरोगामी प्रतिमेच्या चिंधड्या उडाल्या. हा सारा इतिहास असताना त्यांच्या कन्येने तशीच चूक करण्याची गरज नव्हती. साहजिकच, काही जणांना निषेधाचाही मार्ग म्हणून नमाज पठण करण्याची कल्पना सुचली असावी. हल्ली असल्या माकडचाळ्यांना ऊत आला आहेच. त्याला लागलीच जो काही प्रतिसाद मिळाला, तोदेखील या थाटातीलच. शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र असे धार्मिक वा जातीय वातावरण घुसणे आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी काही संघटनांनी पुढाकार घेणे हा देशाच्या सार्वभौमत्वालाच नख लावण्याचा प्रकार आहे. महाविद्यालयातील दोन-चार विद्यार्थ्यांनी खासगी खोलीत नमाज पठण केले असेल तर त्याचा बाऊ करून नंतर शेकडो विद्यार्थ्यांना वेठीस धरणे कितपत योग्य, याचाही विचार व्हायला हवा. मुळात सध्या देशभरातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन व्यवस्थापनाने संबंधित मुलांना असे काही करण्यास परवानगी द्यायला नको होती. विनंती कठोरपणे नाकारली असती तर कदाचित पुढील सगळेच प्रकार टाळता आले असते.

जवळच्या एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन नमाज पठण करण्याचा सल्ला देणे शक्य होते. शाळा, महाविद्यालयांमध्ये जात-पात, धर्म आदींचा विचार शक्यतो होत नाही. सध्या तर खासगी विद्यापीठे, संस्थांमध्ये इतर राज्ये वा देशांमधीलही विद्यार्थी असतात. अशांना त्यांच्या व्यक्तिगत धार्मिक वा इतर संस्कारासाठी वेळ, जागा देण्याची वेळ येत असते. अशाप्रसंगी संस्थेनेच नियम कठोर आणि केवळ शैक्षणिक बाबींपुरते मर्यादित ठेवले तर अशा घटनांनाही आपसूक पायबंद बसू शकेल. हा जातीपातीचा चक्रव्यूह भेदणे सहजी कोणाला शक्य नाही. त्यामुळेच शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थीही कोणत्या ना कोणत्या इझमचे एकतर शिकार तरी असतात किंवा समर्थक तरी. एकीकडे सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणार्‍या विद्यार्थी चळवळी नामशेष होत असताना अशा मुद्यांच्या लाटेवर स्वार होण्याची खुमखुमी असणार्‍यांची चलती आहे. त्यामुळेच खासगी ठिकाणी झालेली ही घटना सार्वजनिक केली गेली आणि तिला तेवढेच आक्रमक प्रत्युत्तर देत वातावरण गढूळ बनविले गेले.

आता त्यात सामंजस्याची कितीही तुरटी फिरविली तरी त्यातील निर्मळता, आत्मिक स्वच्छता पुन्हा येणार नाही. धर्माच्या नावावर जगभर सध्या जे काही चालले आहे, त्या मार्गाने आपण जायला नको, असे वाटणारे अनेक आहेत. अशांसाठी अशा काही मोजक्या वाटल्या तरी घटना या कमालीच्या वेदनादायी ठरतात. म्हणूनच भारताची महानता, सांस्कृतिक समृद्धी आणि एकता यांचे प्रतीक म्हणूण सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा या गीताला प्रत्येकाच्या हृदयात स्थान आहे. आज मात्र परस्पर सामंजस्य आणि निधर्मीवादाचा गुलिस्तां म्हणजेच नंदनवन असलेला हा देश कट्टरतेच्या ज्वालांमध्ये होरपळतोय. हे थांबले पाहिजे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकमधील वृक्षतोडीला ‘हरित लवादा’ची स्थगिती कायम; आयुक्तांसह अधिकाऱ्यांना...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने दि.२८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. तसेच याबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला (Nashik Municipal Administration)...