सिन्नर। प्रतिनिधी Sinnar
शहरातील ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका जे. पी. गावित Superintendent of Rural Hospital J. P. Gavit यांच्याकडे असणारा रुग्णालयातील संपूर्ण सिस्टर इनचार्ज पदाचा कार्यभार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी तडकाफडकी काढून घेतला असून अधिपरिचारिका एस. आर. रावल S R Rawal यांच्याकडे तो सोपवला आहे. कार्यभार हस्तांतराबाबतच्या आदेशात गावित यांना विविध कारणासाठी कसूरवार धरण्यात आले आहे.
गावीत यांना यापूर्वीही कामकाजासंदर्भात अनेक वेळा मौखीक, लेखी विचारणा करून कामकाजात सुधारणा करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कामकाजात कुठल्याही सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.
रुग्णालयातील रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तंतोतंत हिशेब ठेवणे, वेळोवेळी ताळमेळ करून हिशेब ठेवणे, वैद्यकीय अधिकार्यांनी पेपरवर दिलेल्या सूचनांनुसारच रुग्णांना रेमडिसिव्हर दिले जाते की नाही हे पहाणे, याबाबत गावित यांनी कसूर केली असून त्यांच्यामुळेच रेमडिसिव्हर इंजेक्शनचा ताळमेळ करताना अडचणी निर्माण झाल्या असल्याचे आदेशात म्हटले आहे.
ड्यूटी लिस्ट वेळच्या वेळी तयार करणे, ड्यूटी लिस्टनुसार ड्युटीवरील संबंधित अधिपरिचारिकांच्या उपलब्धतेबाबत दक्षता घेणे, स्वच्छता सेवकांकडून दैनंदिन साफसफाई करून घेणे, आंतर रुग्ण व बाह्य रुग्णांच्या पेपरवरील परिपूर्ण नोंदीबाबत दक्षता घेणे, अपूर्ततेनुसार पूर्तता करून घेणे, वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून येणार्या माहितीनुसार माहिती सादर करणे, दैनंदिन रिपोर्टिंग करणे यासारख्या अनेक बाबींबाबत वेळोवेळी सांगूनही सुधारणा होत नसल्याने त्यांच्याकडील कार्यभार रावल यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत आहे.
रावल यांना आदेश मिळताच गावित यांच्याकडील सिस्टर इन्चार्जचा संपूर्ण कारभार स्वीकारुन तसा लेखी अहवाल वैद्यकीय अधीक्षक तथा करोनाच्या तालुका नोडल अधिकार्यांना सादर करावा असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाची प्रत नाशिक मंडळाच्या आरोग्यसेवेचे उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवण्यात आली आहे.
बळीचा बकरा ?
करोनाच्या दुसर्या लाटेत रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या व आपल्या मर्जीतल्या रुग्णांना रेमडिसिव्हर दिले जात असल्याच्या तक्रारी चांगल्याच गाजल्या होत्या. त्यावेळी झालेल्या चौकशीत वैद्यकीय अधीक्षकांच्या कपाटात 12 रेमडिसिव्हर इंजेक्शन्स चौकशी समितीला आढळून आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या अरेरावी व मनमानी कारभाराला रुग्णालयातील सेवक वर्ग कंटाळला होता. त्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती.
या समितीला तक्रारकर्त्या सेवकांनी अनेक पुराव्यासह काही व्हिडीओ क्लिपसही दिल्या होत्या. या चौकशी समितीचा अहवाल देण्यात चालढकल सुरु आहे. त्यातच स्वतःला वाचवण्यासाठी अचानक रेमडिसिव्हरच्या हिशोबात ताळमेळ लागत नसल्यासह विविध कारणे देत गावित यांना बळीचा बकरा बनवले जात असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.




