सप्तशृंगी गड | प्रतिनिधी Nashik / Saptshrungi Gad
आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी गडावर गर्दी झाली, तब्बल ५०-६० हजार भाविकांनी घेतले आदिमाया – आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन. रविवारची सुट्टी व घटस्थापना यांचा दुहेरी योग जुळून आल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच ज्योत घेऊन येणाऱ्या हजारो भाविकांमुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र – परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधींना पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. रविवारी सकाळी सात वाजता विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सह आयुक्त, नाशिक – १ विवेक सोनुने यांनी सपत्नीक देवीच्या पारंपरिक आभूषणांचे विधिवत पूजन केले. यावेळी पुरोहितांना वर्णी दक्षिणा देवून विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून देवीच्या सर्व आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मार्गावर रांगोळी आणि फुलांची सजावट तसेच पारंपरिक वाद्य आणि स्वयंसेवी पथकाने यावेळी श्री भगवतीच्या विविध अलंकार मिरवणुकीत संबळ-हलगी आणि ताशा तसेच टाळ वादनाने तसेच देवीच्या नामाचा सुरू असलेला जयघोष यातून वातावरणात एक चैतन्य निर्मित केले.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक- राहुल रोकडे यांनी सपत्नीक श्री भगवतीच्या पहिल्या माळेची पंचामृत महापूजा केली. विधिवत मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षीने महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली आणि शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृतरीत्या सुरुवात झाली.
मान्यवरांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्याप्रसंगी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळवण रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक, कळवण प्रदिप देशमुख, उपजिल्हाधिकारी बंडू कापसे, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, नाशिक धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव, निरीक्षक हरिहर गाडगे, निरीक्षक अत्तरदे, विशाल सपकाळ, जिल्हा न्यायालय राजशिष्टाचार अधिकारी कांतीलाल परदेशी, कैलास डोंगरे, विश्वस्त संस्थेचे इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, सरपंच रमेश पवार, उपसरपंच श्री संदीप बेनके, राजेश गवळी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रसादलय विभाग प्रमुख नारद अहिरे, मंदिर सहा प्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक सुनिल कासार, भक्तनिवास पर्यवेक्षक प्रशांत निकम, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख रणजीत उगले, प्र. लेखाधिकारी शाम पवार, बांधकाम पर्यवेक्षक सागर निश्चित, संगणक विभाग राज जोशी, खरेदी पर्यवेक्षक किरण राजपूत, वाहन पर्यवेक्षक संतोष चव्हाण, विद्युत विभाग श्री मच्छिंद्र बर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकाच्या गर्दीचा ओघ, मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण आणि धार्मिक विधींचा उत्साह यामुळे सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली. आगामी दिवसांतही आई भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.




