जाकीर शेख | घोटी
- इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी याबाबत झालेल्या बैठकीत आरक्षण निश्चित केल्याची घोषणा केली.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता असून ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाचवेळी घोषित होण्याचा अंदाज आहे. बराच काळ प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील राजकारण अडचणीत सापडले आहे. आता निवडणुका लागण्याची शक्यता वाढल्याने ग्रामीण राजकारणाला गती आली आहे. आज झालेल्या आरक्षण निश्चितीमध्ये अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी कुऱ्हेगाव, अनुसूचित जातीसाठी मुरंबी, अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी मुकणे, समनेरे, अनुसूचित जमातीसाठी गोंदे दुमाला ह्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी नांदुर वैद्य, शेनित, जानोरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्गासाठी साकुर, मालुंजे, पिंपळगांव घाडगा, निनावी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेलगांव कुऱ्हे, कावनई, भरविर खुर्द, माणिकखांब, पिंपळगांव डुकरा, वाघेरे आणि सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी वाडीवऱ्हे, घोटी खुर्द, नांदगांव बुद्रुक, पाडळी देशमुख, सांजेगांव ह्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे.
गावावरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आजपासून हालचाली गतिमान होणार आहे. दहा फेब्रुवारीच्या आत निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे समजताच सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आपआपल्या पॅनलतर्फे फिल्डिंग लावणे सुरु झाले आहे. यासह कागदपत्रांची जुळवाजुळवी करण्यात येते आहे.