नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ६ ते ८ एप्रिल दरम्यान पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. अमेरिका आणि इराण दरम्यान आज पहाटे दोन आठवड्यांचा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. ५ दिवस कोणतेही हल्ले होणार नाहीत. १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेत १० कलमी मुद्द्यांवर दोन्ही देश चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच दरम्यान महागाई प्रचंड वाढली, LPG चा तुटवडा आणि बाकी गोष्टी महाग झाल्या आहेत. त्याच दरम्यान आता भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे.
रिझर्व बँकेचे गर्व्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण जाहीर केले. यावेळी त्यांनी रेपो दरात कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे सामान्यांना ईएमआयचा भार कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. नवीन आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक होती. दरम्यान, आता रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम आहेत. यापूर्वी देखील रिझर्व्ह बँकेने वेट अँड वॉच धोरणाचा अवलंब करत रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता.
मागच्या बैठकीत काय झाले होते?
आपल्या मागील बैठकीत आरबीआयच्या पतधोरण समितीने एकमताने रेपो दर ५.२५% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी, त्यांनी आपला ‘तटस्थ’ धोरणात्मक पवित्राही कायम राखला होता. स्थूल-आर्थिक आघाडीवर आरबीआयने आपल्या आर्थिक वृद्धीच्या अंदाजात सुधारणा करत तो वाढवला होता. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी जीडीपीचा अंदाज पूर्वीच्या ६.७% वरून वाढवून ६.९% करण्यात आला होता, तर दुसऱ्या तिमाहीसाठीचा अंदाज ६.८% वरून वाढवून ७% करण्यात आला होता.
यावेळी भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संजय मल्होत्रा म्हणाले. पुरवठा साखळीत काही बाधा आहेत, त्यामुळे काही क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थांच्या वाढीत बाधा निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.




