Thursday, May 2, 2024
Homeनाशिकवैद्यकिय अधिकार्‍यांचे निवासस्थान बनले कचरा संकलन केंद्र

वैद्यकिय अधिकार्‍यांचे निवासस्थान बनले कचरा संकलन केंद्र

डांगसौंदाणे । निलेश गौतम

साल्हेर प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवास्थानाची बांधकाम पूर्ण होण्याआधीच दुरवस्था झाली आहे.

- Advertisement -

सदरची इमारत जैविक कचरा संकलन केंद्र बनल्याने 16 लाखाचा निधी वाया गेला आहे. निधीचा गैरवापर करणार्‍यांविरूध्द जि.प. प्रशासनातर्फे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सहा वर्षापुर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी निवास्थान बांधकाम करण्यासाठी तत्कालीन जि.प. सदस्य सिंधुताई सोनवणे यांच्या माध्यमातुन 16 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

साल्हेर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी सदरचे बांधकाम करण्यास ग्रामपंचायत सक्षम असल्याचा दाखला देत हे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा घाट घातला मात्र तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांना टक्केवारीच्या लागलेल्या वाळवीमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही तर तत्कालीन अधिकार्‍यांनाही हे काम पूर्ण करून घेता आले नसल्याने 16 लाखाचा निधी वाया गेला आहे.

याबाबत वेळोवेळी पाठपुरवा करूनही हे काम संबंधित अधिकारी पूर्ण करून घेऊ शकले नाही तर ज्या पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी सरकारी पैसे स्वत:चा समजत निधीचा गैरवापर केला त्यांच्यावर ही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही या सर्व प्रकारात मात्र ही इमारत दवाखान्यासाठी जैविक कचरा संकलन केंद्र बनली आहे.

यानंतर याच दवाखान्याला मात्र मुख्य इमारत दुरुस्तीसाठी तत्कालीन आरोग्य सभापती यतीन पगार यांच्या काळात 50 लाखांचा निधी मिळून दवाखान्याला वैभव मिळाले. मात्र येथे आरोग्य सेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांचे निवासस्थान जैसे थे राहिले. मात्र सध्या करोना स्थितीत वैद्यकीय अधिकार्‍यांना दवाखान्याच्या गोदामात आश्रय घ्यावा लागतो हे विशेष आहे.

या कामातील लोखंडी ग्रील (खिडक्या) मात्र तत्कालीन सरपंचाने आपल्या घरी ठेवल्याची माहिती मिळते. प्रशासनाने याकडे डोळेझाक करत ही 16 लक्ष रुपयांची इमारत दुर्लक्षित म्हणून पूर्ण होण्या आधीच सोडून दिल्याने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता या भागातील सर्वसामान्य आदिवासी जनता विचारत आहे.

आदिवासी भागातील साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान दुरुस्ती करून ते वैद्यकीय अधिकारी निवासासाठी कसे वापरात येईल याबाबत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात येईल. गटविकास अधिकारी व बांधकाम उपअभियंता यांच्याशी बोलून काम मार्गी लावण्यात येईल व तत्कालीन कामाची चौकशी होऊन संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल.

– इंदुबाई ढुमसे, सभापती, पं.स. बागलाण

आदिवासी भागातआदिवासी भागातील विकासकामे हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येतात. पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना येणार्‍या निधीतून हा विकास होतो. मात्र काही ठिकाणी ग्रामसेवक व स्थानिक पुढारी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे निधीचा अपव्यय होतो. वैद्यकीय निवासस्थान हे त्याचे उत्तम उदारहण आहे.

– संजय सोनवणे, संचालक, कृउबा सटाणा

- Advertisment -

ताज्या बातम्या